भारतासाठी पहिले सत्र चांगले ठरले. कारण पहिल्या सत्रात भारताने न्यूझीलंडच्या तीन विकेट्स पटकावल्या होत्या. त्यामुळे भारतीय संघ न्यूझीलंडचा डाव लवकर गुंडाळेल, अशी शक्यता निर्माण झाली होती. पण न्यूझीलंडचा कर्णधार आणि तळाच्या फलंदाजांनी यावेळी चांगल्या धावा केल्या. त्यामुळे भारताला पहिल्या डावात आघाडी मिळवता आली नाही. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनने यावेळी ४९ धावांची खेळी साकारली. पण तळाच्या फलंदाजांनी चांगल्या धावा केल्यामुळे त्यांना २४९ धावांपर्यंत मजल मारता आली. यावेळी न्यझीलंडला ३२ धावांची आघाडी घेता आली होती. भारताकडून यावेळी सर्वाधिक चार विकेट्स या मोहम्मद शमीने पटकावल्या, इशातं शर्माने यावेळी तीन विकेट्स मिळवत शमीला चांगली साथ दिली. आर. अश्विनने यावेळी दोन, तर रवींद्र जडेजाने एक बळी मिळवला.
भारताच्या डावाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. कारण भारताला शुभमन गिलच्या रुपात पहिला धक्का बसला. गिलला यावेळी ८ धावांवर समाधान मानावे लागले. गिल बाद झाल्यावर रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा यांनी दमदार फलंदाजी करत भारताला आघाडी मिळवून दिली. रोहितने यावेळी चांगली सुरुवात केली. पण चांगली सुरुवात करुनही रोहितला यावेळी मोठी खेळी साकारता आली नाही. रोहितला यावेळी ३० धावांवर समाधान मानावे लागले. पहिल्या डावातही रोहितने चांगली सुरुवात केली होती, पण त्यावेळी तो ३४ धावांवर बाद झाला होता. रोहित शर्मा बाद झाल्यावर कर्णधार विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांची चांगली जोडी जमली. या जोडीने पाचवा दिवस खेळून काढला असून पुजारा नाबाद १२ आणि कोहली नाबाद ८ खेळत होते.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times