म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः करोनामुळे गेल्या वर्षी राज्य सरकारने गणेशोत्सवावर निर्बंध घातले. अनेक मंडळांनी उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा केला. यंदा करोना नियंत्रणात आहे. त्यामुळे गणेशोत्सव परंपरेप्रमाणे धूमधडाक्यात साजरा होणार की, यंदाही कठोर निर्बंधाला सामोरे जावे लागणार, यावरून चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर मूर्तीच्या उंचीसह उत्सवाच्या संभाव्य नियमावलीबाबत चर्चा करण्यासाठी गणेश मंडळे, गणेशोत्सव समन्वय समिती, मुंबई महापालिका आणि पोलिसांची लवकरच यांच्या सोबत बैठक होणार आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स’ने या विषयी सोमवार २१ जूनच्या अंकात प्रसिद्ध केलेल्या बातमीची दखल घेऊन आता थेट मुख्यमंत्र्यांकडेच बैठक होणार आहे.

गणेशोत्सवाच्या दहा दिवसात अवघी मुंबापुरी उत्साहाने न्हाऊन निघते. मुंबईला सव्वाशेहून अधिक वर्षांची सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा आहे. मात्र करोनामुळे गेल्या वर्षी उत्सवावर नियंत्रण आले होते. त्यानंतर यंदाच्या फेब्रुवारीपासून आलेली करोनाची दुसरी लाट ओसरली असून तिसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे यंदा गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीने होणार की, निर्बंधांना सामोरे जावे लागणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. १० सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरू होत आहे. उत्सवाला अडीच महिने असले, तरी मूर्ती, मंडप, सजावटीची तयारी आतापासूनच करावी लागणार आहे. मात्र अद्याप सरकार आणि पालिकेने भूमिका स्पष्ट न केल्याने मंडळे संभ्रमात आहेत.

या पार्श्वभूमीवर लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. मूर्तींची उंची, मंडप परवाने यांसह अनेक मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा केली जाणार आहे, असे महापौरांनी स्पष्ट केले.

गणेशोत्सव समन्वय समितीने उत्सवासाठी नियमावली आवश्यक असल्याचा आग्रह पालिका आणि सरकारकडे धरला आहे. समितीने मंडळांकडूनही सूचना मागवल्या आहेत. या बैठकीत आम्ही हे मुद्दे मांडणार असल्याचा समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर यांनी सांगितले. मूर्ती घडवण्याचे काम तीन ते चार महिने आधी सुरू करावे लागते. त्यासाठी आवश्यक परवानग्या पालिकेने मूर्तिकारांना द्याव्यात, तसेच मंडळांनी दर्शनासाठी ऑनलाइन व्यवस्था करावी, अशा सूचना समितीने केल्या आहेत.

मंडळांनी केलेल्या सूचना

– गणेश मूर्तींसाठी उंचीची मर्यादा नसावी.

– मंडप, ध्वनिक्षेपक परवाने ठरलेल्या धोरणानुसार वितरित करावे.

– पीओपी वापराबाबत निर्माण झालेल्या संभ्रमावर ठोस निर्णय घ्यावा.

– दर्शनासाठी सुरक्षेचे नियम पाळून परवानगी द्यावी.

– आगमन, विसर्जन मिरवणुकाबाबत धोरण निश्चित करावे.

– चौपाट्या विसर्जनासाठी खुल्या कराव्यात.

– मंडळाच्या जागेत लसीकरणाला परवानगी द्यावी.

– मंडळ कार्यकत्यांनी लशीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या असाव्यात.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here