म. टा. प्रतिनिधी, मुंबईः गेल्या काही महिन्यांपासून तेल दरवाढीने हैराण झालेल्या लोकांना लवकरच काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मुंबई बंदरावर खाद्यतेलाची आयात वाढण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे खाद्यतेलाच्या दरात आणखी घसरण होण्याची आशा निर्माण झाली आहे. मलेशिया व इंडोनेशियातून तेलाची आवक वाढण्याची चिन्हे आहेत.

भारतात एकूण गरजेच्या ६० ते ६५ टक्के आयात केले जाते. यामध्ये पामतेलाचे प्रमाण सर्वाधिक आहे. मुंबईत हॉटेल्स, रेस्तरां तसेच रस्त्यावरील खाद्यान्न स्टॉल्सचा आकडा मोठा आहे. या सर्व ठिकाणी पामतेलाचा वापर केला जातो. भारताच्या एकूण गरजेच्या १० ते १२ टक्के पामतेलाचा वापर एकट्या मुंबई शहरात होतो. मागील काही महिन्यांपासून पामतेलाची आयात ३५ टक्के घसरली होती. पामतेलाची उपलब्धता कमी झाल्याने अन्य सर्वच खाद्यतेलांचे दर भरमसाठ वाढले. आता मात्र आयात हळूहळू वाढत असल्याचे तेल व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

अखिल भारतीय खाद्यतेल व्यापारी महासंघाचे अध्यक्ष शंकरभाई ठक्कर यांनी सांगितले की, ‘मलेशिया व इंडोनेशिया या दोन्ही देशांतील खाद्यतेल उत्पादनात साधारण १३ ते १५ टक्के वाढ होत आहे. त्यामुळे तेलाच्या आयातीत आता हळूहळू वाढ होईल. त्याचवेळी इंडोनेशियाने पामतेल निर्यातीवरील अधिभार २५५ डॉलर प्रति टनावरुन १७५ डॉलर प्रति टनापर्यंत खाली आणला. त्याचादेखील सकारात्मक परिणाम आता दिसू लागेल. येत्या १५ दिवसांत खाद्यतेलाच्या दरांत आणखी घसरणीची अपेक्षा आहे.’ तेलाचे दर कमी झाल्यास महागाईने पोळलेल्या नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here