म. टा. खास प्रतिनिधी अंधेरी : सखल भाग असलेल्या अंधेरी सबवेमध्ये मुसळधार पाऊस झाल्यास पाणी साचते. यामुळे अपघात तसेच अन्य दुर्घटना घडू नये यासाठी अंधेरी सबवे २१ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत रात्रीच्या वेळेस वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गैरसोय टाळण्यासाठी वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन मुंबई वाहतूक पोलिसांनी केले आहे.

मुंबईत अतिवृष्टी झाल्यास अंधेरी सबवेमध्ये पाणी साचते. यावर्षी पावसाळा सुरू झाल्यापासून दोन ते तीन वेळा या ठिकाणी पाणी साचले. अपघात अथवा दुर्घटना घडू नये यासाठी येथे पोलिस तैनात करण्यात येतात. मात्र रात्रीच्या वेळेस साचलेल्या पाण्याचा अंदाज येत नाही. म्हणून २१ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत हा सबवे वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आल्याचे वाहतूक पोलिस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे. वाहनचालकांनी या वेळी जोगेश्वरी येथील बाळासाहेब ठाकरे उड्डाण पूल, मीलन सबवे, अंधेरी येथील गोपाळकृष्ण गोखले उड्डाण पूल या पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे पोलिसांनी म्हटले आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here