अकोला : पालकमंत्री बच्चू कडू यांनी सोमवारी अकोला जिल्ह्यात केलेल्या गुप्त दौर्यात अनेक पोलिसांच्या चुकीच्या बाबी त्यांच्यसमोर उघड झाल्या. यामध्ये बच्चू कडू हे युसुफ खान बनून पालिकेत शिरले आणि धडक कारवाई केली. यानंतर पोलीस अधीक्षकांकडे संबंधित पोलिसांचा अहवाल सुद्धा पाठवण्यात आला आहे. त्यानंतर कर्मचाऱ्यांची दिरंगाई समोर आल्याने प्रभारी पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांनी काल अशा पोलिसांवर कारवाई करण्याचा आदेश दिला आहे.

पातुर पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याचं निलंबन करण्यात आलं. तर अकोला शहरातील जुने शहर पोलीस ठाण्यातील तीन कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात येणार आहे. याची चौकशी शहर पोलीस अधिक्षक सचिन कदम यांच्याकडून चौकशी सुरू करण्यात आली असून या चौकशीत नेमकं काय समोर येईल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे..

यावेळी बच्चू कडू यांनी एक स्टिंग ऑपरेशन केलं. यावेळी त्यांनी दुपारच्या वेळेत शहरातील रेशन दुकानामध्ये जातात. धान्य आहे का? असं विचारलं असता त्यांना नकार देण्यात आला. त्यानंतर ते एका पान सेंटरमध्ये गेले आणि गुटखा खरेदी केला. यानंतर बच्चू कडू हे अकोला महापालिका कार्यालयात शिरले. महापालिका आयुक्त कार्यालयात त्यांना सुरक्षा रक्षकांकडून अडवलं गेलं.

आयुक्तांना भेटायची विनंती केल्यानंतर त्यांच्या सहाय्यकांनी आयुक्तांना भेटायचं असेल तर चार ते पाच वाजता या असं बजावलं. त्यानंतर बच्चू कडू हे तिथून निघून गेले. पण काही वेळाने मात्र धक्कादायक बाब समोर आली. ही अनोळखी व्यक्ती दुसरी-तिसरी कोणी नसून ते स्वतः बच्चू कडू होते हे सगळ्यांच्या लक्षात आलं आणि यानंतर मात्र महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा एकच गोंधळ उडालेला पाहायला मिळाला.

अभिनव आंदोलने किंवा उपक्रमांसाठी प्रसिद्ध असलेल्या बच्चू कडू यांनी सोमवारी वेशांतर करून शहरातील विविध ठिकाणी भेटी देऊन तेथील कारभार जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी पालकमंत्री बच्चू कडू वेगळ्याच मुडमध्ये दिसले. त्यांनी शासकीय यंत्रणेला गाफील ठेवत, वेगळाच पेहराव परिधान केला आणि या वेशातच त्यांनी पहिली धडक दिली ती म्हणजे महापालिका कार्यालयामध्ये…

या ठिकाणी त्यांनी महापालिका आयुक्तांच्या कार्यालयात शिरण्याचा प्रयत्न केला . यावेळी तेथील सुरक्षा रक्षकांनी त्यांची अडवणूक केली. परंतु तेथील आयुक्तांचे स्वीय सहाय्यक व कर्मचाऱ्यांनी सुद्धा पालकमंत्री बच्चू कडू यांना ओळखले नाही . तेथून पालकमंत्री कडू यांनी आपला मोर्चा महापालिकेतून पातूरकडे वळवला आणि पातूर तालुक्यातील कृषी सेवा केंद्रांमध्ये जाऊन बियाणे, खतांची त्यांची उपलब्धतता, किंमती याची माहिती जाणून घेतली.

नंतर त्यांनी पातुरातील काही पानटपऱ्यांवर जाऊन गुटख्याची मागणी केली. गुटख्याची पाकिटे खरेदी केली. नंतर तहसील कार्यालयात जाऊन झाडाझडती घेतली. यावेळी अधिकारी, कर्मचारीसुद्धा अनभिज्ञ होते. तहसील कार्यालयात तोंडावरचे मास्क काढल्यानंतर काहींना त्यांची ओळख पटली. या सर्व दौऱ्यात मात्र बच्चू कडू यांचं वेगळं रूप पाहायला मिळाले आणि अधिकाऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली. या सर्व गुप्त दौऱ्यात त्यांना अनेक पोलिसांच्या चुकीच्या बाबी उघड झाल्या. यामुळे आता त्यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत. राज्यमंत्रांचे आशेच जर गुप्त दौरे राहिले तर जिल्ह्यातील अवैध धंदे अंकुश बसेल, असं स्थानिकांचं म्हणणं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here