सिंधुदुर्ग : सिंधुदूर्ग जिल्ह्यात कोरोना आजाराचा नवीन स्ट्रेन ( डेल्टा प्लस) चा पहिला रुग्ण समोर आला आहे. कणकवली परबवाडी इथे पहिला रुग्ण आढळ्याची माहिती देण्यात आली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून बाधीत भागात अन्य रुग्ण आहेत का याचा शोध आरोग्य यंत्रणा घेत आहे. रत्नागिरी जिल्ह्यानंतर तळ कोकणात दुसऱ्या जिल्ह्यात रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे.

देशातील तीन राज्यात महाराष्ट्र, केरळ, मध्यप्रदेशमध्ये रुग्ण आढळले असून राज्यात जळगाव, रत्नागिरीनंतर सिंधुदूर्गमध्ये हा रुग्ण आढळला आहे. प्रशासन आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कोविड 19 बाधीत व्यक्तीच्या संपर्कातील नागरिकांची शोध मोहीम सुरू केली आहे. मात्र, सध्या जिल्ह्यात अन्य रुग्ण नाहीत असा निर्वाळा जिल्हाशल्य चिकित्सक श्रीपाद पाटील यांनी दिला आहे. तर केंद्राच्या आरोग्य विभागाने अलीकडेच डेल्टा प्लसबाबत सतर्कता बाळगण्याचा सूचना 3 राज्यांना दिल्या आहेत.

दरम्यान, वैद्यकीय तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, अद्याप डेल्टा प्लस ‘व्हेरियंट ऑफ कन्सर्न’ किंवा ‘व्हेरियंट ऑफ इंटरेस्ट’ अर्थात ‘उत्परिवर्तन अवस्थेत’ आहे. करोना व्हायरसचं डबल म्युटेशन सर्वात अगोदर महाराष्ट्रात आढळून आलं होतं. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, डेल्टा प्लस व्हेरियंट रुग्णांच्या रोग प्रतिकारशक्तीला चकवा देऊ शकतो. भारतात सर्वात अगोदर आढळून आलेल्या ‘डेल्टा व्हेरियंट’मध्ये बदल होऊन ‘डेल्टा प्लस व्हेरियंट’ तयार झाल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

डेल्टा प्लस व्हेरियंटची प्रकरणं केरळ, महाराष्ट्र, मध्य प्रदेश यांसहीत इतर राज्यांतही आढळून आली आहेत. आतापर्यंत महाराष्ट्रात सर्वाधिक २१, मध्य प्रदेशात ६, केरळमध्ये ३, तामिळनाडूमध्ये ३ तर पंजाब – आंध्र प्रदेश – जम्मू काश्मीर या राज्यांत प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे.

मंगळवारी सायंकाळी आरोग्य मंत्रालयानं पत्रकार परिषदेत या अधिकाऱ्यांनी डेल्टा प्लस व्हेरियंटची माहिती दिली होती. या दरम्यान, डेल्टा प्लस व्हेरियंट भारतासहीत नऊ देशांत आढळून आल्याचं आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितलं होतं. यामध्ये भारत, यूके, यूएस, जपान, रशिया, पोर्तुगाल, स्वित्झर्लंड, नेपाळ आणि चीन या देशांचा समावेश आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here