गेल्या १५ महिन्यांपासून कोल्हापूरकर करोनाच्या संकटाशी लढा देत आहे. इतर जिल्ह्यात हे संकट कमी होत असताना या जिल्ह्यातील कहर मात्र कायम आहे. पण अशा संकटकाळात जे मदतीचे हात पुढे येत आहेत, ते निश्चितच कौतुकास्पद आहेत. जिवाची पर्वा न करता कोविड सेंटर उभारणारी व्हाईट आर्मी, व्हिजन चॅरिटेबल ट्रस्ट असो वा गरजूंना अन्नदान करणारे संकटमोचक. करोनाने मृत्यू झालेल्या मृतदेहाची शववाहिका चालविरी युवती असो वा पॉकेटमनीतून रूग्णांच्या नातेवाईकांना नाष्टा देणाऱ्या युवती. नावासाठी नाही तर सेवेसाठी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून काम करणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे.
पडद्यामामागे राहणारे जनसामान्य हेच खरे संकटकाळातील हिरो आहेत. त्यामुळे या हिरोंचा सन्मान करण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांनी पुढाकार घेतला. त्यासाठी कौतुकाचे फलक शहरासह जिल्ह्यातील चौकाचौकात लावण्यात आले. याचवेळी भाजपने देखील ‘अभिमान कोल्हापूरचा’ अशा आशयाचे फलक झळकावले आहेत. दोघांच्या फलकावरील हिरो तेच. फक्त खाली नेत्यांची नावे वेगळी. या निमित्ताने कोल्हापुरात कौतुकाचे आगळे वेगळे युद्ध पाहायला मिळत आहे.
राजकारणात किती स्पर्धा वाढली आहे याचेच हे उत्तम उदाहरण म्हणावे लागेल.
‘…म्हणून हा उपक्रम सुरू केला’
‘करोनाच्या या संकटात अनेकजण पडद्यामागे राहत मदतीचा हात पुढे करत आहेत. काहीजण स्वत:चा जीव धोक्यात घालून इतरांची सेवा करत आहेत. अशांचे कौतुक करण्यासाठी कृतज्ञतेचे चार शब्द नक्कीच बळ देणारे आहेत. म्हणूनच हा उपक्रम राबविला जात आहे,’ असं पालकमंत्री सतेज पाटील यांनी म्हटलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times