या विषाणूचा प्रादुर्भाव सध्या कोकण परिसरात दिसत आहे. डेल्टा प्लस विषाणूच्या तपासणीसाठी राज्यभरातून साडेसात हजार नमुने पाठवण्यात आले होते. यातील २१ रुग्णांना या विषाणूची बाधा झाल्याचं स्पष्ट झालं. याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी रात्री उशिरा माहिती दिली होती.
कुठल्या भागात आढळले डेल्टा प्लस विषाणूबाधित रुग्ण?
राज्यात डेल्टा प्लस विषाणूची लागण झालेल्या २१ रुग्णांमधील नऊ रुग्ण रत्नागिरी, जळगावचे सात, मुंबई दोन आणि पालघर, सिंधुदुर्ग, ठाणे येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे. या विषाणूच्या तपासणीसाठी राज्यभरातून सुमारे साडेसात हजार नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते.
‘राज्यातील इतर भागांच्या तुलनेत रत्नागिरी आणि एकूणच कोकण परिसरात करोनाच्या दुसऱ्या लाटेने उशिरा धडक दिली. आताही या परिसरात करोना पॉझिटिव्हीटी दर इतर भागाच्या तुलनेत जास्त आहे. या परिसरात आधी अनेक लोक बाधित झालेले नसल्याने या विषाणूला स्वत:मध्ये बदल करण्यासाठी तिथे संधी मिळत आहे. मात्र विदर्भात सध्या परिस्थिती वेगळी आहे,’ असं साथरोग तज्ज्ञ डॉ. नितीन शिंदे यांनी म्हटलं आहे.
देशात काय आहे स्थिती?
भारतात आतापर्यंत करोना विषाणूच्या ‘डेल्टा प्लस व्हेरियंट’चे ४० हून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. यातील सर्वाधिक प्रकरणं महाराष्ट्रातून समोर आली आहेत.
वैद्यकीय तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, अद्याप डेल्टा प्लस ‘व्हेरियंट ऑफ इंटरेस्ट’ अर्थात ‘उत्परिवर्तन अवस्थेत’ आहे. करोना व्हायरसचं डबल म्युटेशन सर्वात अगोदर महाराष्ट्रात आढळून आलं होतं. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, डेल्टा प्लस व्हेरियंट रुग्णांच्या रोग प्रतिकारशक्तीला चकवा देऊ शकतो. भारतात सर्वात अगोदर आढळून आलेल्या ‘डेल्टा व्हेरियंट’मध्ये बदल होऊन ‘डेल्टा प्लस व्हेरियंट’ तयार झाल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times