: कौटुंबिक वादामुळे माहेरी गेलेल्या पत्नीचा भरबाजारात चॉपरने भोसकून खून (Jalgaon Wife Murder) केल्याची घटना समोर आली आहे. त्यानतंर आरोपी पतीने पत्नीच्या घरी जाऊन मेहुण्यावर देखील चॉपरने वार केले. यानतंर पुन्हा पत्नी जिंवत आहे का ते पाहण्यासाठी हा विक्षिप्त तरुण बाजारात आला असता, त्याला ग्रामस्थांनी चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. आज बुधवारी दुपारी १.३० वाजता पाळधी गावात घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण जिल्हा हादरला आहे.

पूजा सुनिल पवार (वय २६) असे मृत महिलेचे नाव आहे. शंकर भिका चव्हाण (वय २०, दोघे रा. मातंगवाडा, पाळधी) हा गंभीर जखमी झाला आहे. पती सुनिल बळीराम पवार (वय ३४, रा. जळगाव) याला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

पूजा आणि सुनिल पवार या दाम्पत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक कारणावरुन वाद सुरू होता. याच वादामुळे आणि एका लग्नासाठी गेल्या १६ फेब्रुवारीपासून पुजा माहेरी म्हणजे पाळधीत गेली होती. दरम्यानच्या काळात दोघांमध्ये वाद सुरूच होते. सुनिलच्या त्रासाला कंटाळून पुजाच्या माहेरच्यांनी सुनिलविरोधात पाळधी पोलिसात तक्रारही केली होती .या गुन्ह्याच्या चौकशीसाठी पोलिसांनी सुनिलला आज बुधवारी बोलावले होते. मात्र, सुनिल पोलिस ठाण्यात न जाता चॉपर घेऊन पाळधीत पोहोचला.

दुपारी दीड वाजता सुनिलची पत्नी पुजा लहान मुलीसोबत मारवाडी गल्लीत एका दुकानात काही वस्तू खरेदी करत होती. पूजा समोर येताच सुनिलने तिच्यावर चॉपरने आठ ते दहा वार केले. जखमी पूजा विव्हळत तेथेच कोसळली. ही घटना पाहून गावकऱ्यांनी पूजाकडे धाव घेतली. तर सुनिल हा चॉपर घेऊन पायी चालतच पूजाच्या घराकडे गेला. त्याने घरात घुसून मेहुणा शंकर चव्हाण याच्यावर हल्ला चढवला. त्याच्या पोटात चॉपरने तीन वार करुन तेथून निघाला.

पत्नीवर हल्ला केल्यानंतर ती जिवंत आहे की मृत पावली हे पाहण्यासाठी सुनिल पुन्हा बाजारात घटनास्थळी आला. यावेळी पूजाच्या नातेवाईकांसह काही तरुणांनी सुनिलला पकडून चांगलाच चोप दिला. यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. जखमी पूजा व शंकर यांना रुग्णवाहिकेतून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पोहोचवले. उपचार सुरू करण्यापूर्वीच पूजाचा मृत्यू झाला होता. तर शंकरला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

पोलिसांनी रुग्णालयात येऊन जखमी शंकर याच्याकडून घटनेची माहिती घेत जबाब नोंदवला असून त्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here