साऊदम्पटन : फायनलमध्ये भारताला न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर भारताकडून नेमक्या कोणत्या मोठ्या चुका झाल्या हे कर्णधार विराट कोहलीने यावेळी सांगितले.

कोहली म्हणाला की, ” पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ वाया गेला होता. त्यामळे दुसऱ्या दिवशी फलंदाजी करणे सोपे नव्हते. पण तिसऱ्या दिवशी आमच्याकडून जास्त धावा झाल्या नाहीत. त्याचबरोबर सामन्याच्या आजच्या सहाव्या दिवशी भारतीय संघाला चांगल्या धावा करता आल्या नाहीत. माझ्यामते भारताने अजून ३०-४० धावा केल्या असत्या, तर न्यूझीलंडला हे आव्हान पार करणे सोपे गेले नसते. भारताच्या गोलंदाजांनी यावेळी चांगली कामगिरी केली. पण फलंदाजीमध्ये नक्कीच आम्ही कमी ठरलो. भारताचा हा सर्वोत्तम संघ आहे आणि आतापर्यंत आम्ही गेल्या दोन वर्षांमध्ये दमदार कामगिरी केली आहे. पण फायनलमध्ये न्यूझीलंडने चांगला खेळ केला, त्यामुळे विजेतेपद पटकावल्यामुळे त्यांचे अभिनंदन करायला हवे.”

कोहलीला आतापर्यंत आयसीसीच्या एकाही मोठ्या स्पर्धेचे जेतेपद पटकावता आलेले नाही. यापूर्वीही पाकिस्तानविरुद्धच्या फायनलमध्ये विराटच्या नेतृत्वाखाली भारताला पराभव पत्करावा लागला होता. त्याचबरोबर २०१९ साली झालेल्या विश्वचषकात भारताला उपांत्य फेरीतच गाशा गुंडाळावा लागला होता. त्यामुळे आतापर्यंत कोहलीच्या नावावर आयसीसीच्या मोठ्या स्पर्धेचे एकही जेतेपद नसल्याचे पाहायला मिळत आहे.

भारताने न्यूझीलंडपुढे १३९ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने न्यूझीलंडच्या सलामीवीरांना झटपट बाद केले होते. पण त्यानंतर केन विल्यम्सन आणि रॉस टेलर यांनी दमदार फलंदाजी करत संघाला आठ विकेट्स राखून विजय मिळवून दिला. आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या दोन्ही सलामीवीरांना आर. अश्विनने बाद केले. यावेळी भारताला सामन्यात पुनरागमन करण्याची चांगली संधी होती. पण यावेळी चेतेश्वर पुजाराने रॉस टेलरचा २६ धावांवर झेल सोडला आणि त्याला जीवदान दिले. भारताला हा मोठा फटका बसला. कारण त्यानंतर टेलर आणि कर्णधार केन विल्यम्सन या जोडीने दमदार फलंदाजी केली आणि संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. या दोघांच्या फलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडने या फायनलचे जेतेपद पटकावले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here