गृहनिर्माणमंत्री यांनी म्हाडाच्या १०० सदनिका टाटा कॅन्सर रुग्णालयाला देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्या निर्णयाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थगिती दिली. या प्रकरणी विरोधकांकडून राजकारण तापवले जाऊ नये, याची काळजी मुख्यमंत्र्यांनी घेतल्याचे दिसून आले. त्यानंतर बुधवारी त्याच परिसरात या सदनिका देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आव्हाड यांनी दिली.
या निर्णयाची माहिती खुद्द जितेंद्र आव्हाड यांनीच प्रसारमाध्यमांना माहिती दिली. १०० सदनिका रुग्णांच्या नातेवाईकांसाठी देण्यात येत असल्याने या गोष्टीला काही स्थानिकांनी विरोध केल्याचे कारण सांगत शिवसेनेच्या आमदारांनी याला स्थगिती देण्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे निवेदन दिले होते. मुख्यमंत्र्यांनी त्याला स्थगिती दिली. मात्र नंतर मुख्यमंत्र्यांनी बुधवारी मला बोलावून घेतले आणि त्याच परिसरात आजच्या आज जागा शोधून निर्णय घ्या, असे सांगितले. त्यानंतर १५ मिनिटांत निर्णय झाला. बॉम्बे डाईंगमध्ये १०० सदनिका देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती आव्हाड यांनी दिली.
कॅन्सर हॉस्पिटलला दिलेल्या सदनिकांना निर्णय स्थगित केल्यानंतर या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीत सत्तासंघर्ष सुरु असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत होता. त्यामुळे नव्या निर्णयाची माहिती देत असतानाच महाविकास आघाडी सरकारमध्ये कुठलाही विसंवाद नाही. विसंवाद असता तर २४ तासांच्या आत निर्णय झाला नसता. मला आनंद याचा आहे की, मंगळवारी मिळालेल्या स्थगितीनंतर तेवढ्याच जागा, त्याच परिसरात देऊ शकलो, असेही आव्हाड यांनी म्हटले आहे. मात्र मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर काही महत्त्वाच्या निर्णयांबाबत मुख्यमंत्र्यांना व्यवस्थित माहिती दिल्याशिवाय निर्णय घेणे हे प्रशासकीय प्रथेला धरून नाही. याचेही भान काही मंत्र्यांनी बाळगणे गरजेचे आहे. स्वपक्षातील ज्येष्ठ नेत्यांसोबत मधुर संबंध ठेवण्याबरोबरच मुख्यमंत्र्यांशी केवळ गोड बोलायचे व निर्णय घेताना परस्पर घ्यायचे हे योग्य नाही, हे योग्य नव्हे, असे एका ज्येष्ठ मंत्र्याने ‘मटा’शी बोलताना सांगितले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times