मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून प्रत्यक्षात उतरलेल्या शिवभोजन योजनेला भरघोस प्रतिसाद मिळत असून या योजनेचा आणखी विस्तार करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यानुसार थाळींच्या संख्येत तातडीने वाढ करत ती दुप्पट म्हणजेच १८ हजारवरून ३६ हजार इतकी करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाची अन्न व नागरी पुरवठा विभागाने तातडीने अंमलबजावणी केली आहे.

राज्यात प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शिवभोजन योजनेची अंमलबजावणी करण्यात आली होती. पहिल्या दिवसापासूनच या योजनेला राज्यातील गोरगरीब जनतेने उदंड प्रतिसाद दिला असून मुख्यमंत्र्यांनी अनेक शिवभोजन थाळी केंद्रांना भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधला व त्यांची मते जाणून घेतली. या भोजनाचा आस्वाद घेणाऱ्या सर्वांनीच समाधान व्यक्त केले आहे. शिवाय सध्या जेवढ्या प्रमाणात थाळींचे वितरण होत आहे ते अपुरे पडत असल्याचेही निदर्शनास आले. त्यामुळेच थाळींची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.

ठळक बाबी…

> मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने निर्देश दिले आहेत. त्यानुसार सध्या प्रत्येक शिवभोजन केंद्रासाठी असलेले किमान ७५ व कमाल १५० थाळींचे उद्दिष्ट मागणीनुसार वाढवून किमान ७५ आणि कमाल २०० थाळी इतके वाढवता येईल.

> अन्न, नागरी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांव्यतिरिक्त तहसीलदार, गट विकास अधिकारी तथा समकक्ष अधिकाऱ्यांमार्फत शिवभोजन केंद्राची भेट व तपासणी करण्याबाबत सूचनाही देण्यात आल्या आहेत. या भेटी दरम्यान त्यांनी शिवभोजन केंद्रावरील स्वच्छता, नीटनेटकेपणा, अन्नाची गुणवत्ता या बाबींकडे लक्ष द्यायचे आहे.

> पहिल्या टप्प्यात केवळ शासकीय कार्यालये, रुग्णालये, बस आणि रेल्वे स्थानके, बाजारपेठा यांसारख्या सार्वजनिक ठिकाणीच योजना राबविली जात असली तरी भविष्यात योजनेचा आणखी विस्तार करण्याचे नियोजित आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here