ओबींसीच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्दावर भाजपकडून राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहेत. जळगाव जिल्ह्याचे नेतृत्व खासदार रक्षा खडसे यांच्याकडे देण्यात आले आहे. या आंदोलनाची माहिती खासदार रक्षा खडसे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जि.प.अध्यक्षा रंजना पाटील, जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुरेश भोळे, उत्तर महाराष्ट्र संघटन प्रमुख डॉ. राजेंद्र फडके, जि.प.उपाध्यक्ष लालचंद पाटील, आ. संजय सावकारे, माजी आमदार स्मिता वाघ, महानगरप्रमुख दीपक सुर्यवंशी, उपजिल्हाप्रमुख पी.सी.पाटील आदी उपस्थित होते.
पत्रकार परिषदेपूर्वी झालेल्या भाजपच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना आमदार सुरेश भोळे यांनी सरकारवर जोरदार टीका केली. राज्यातील आघाडी सरकार हे बिघाडी सरकार आहे. मराठा आरक्षण व ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरील अपयश झाकण्यासाठीच दोन दिवसात अधिवेशन गुंडाळण्याचा घाट बिघाडी सरकारने घातला असल्याचा आरोप सुरेश भोळे यांनी केला. राज्यातील आघाडी सरकार हे नागरिकांच्या दृष्टीने करंटे सरकार असून मराठा समाजानतंर पु्न्हा ओबीसी समाजावर देखील या सरकारने अन्याय केला आहे. चक्काजाम आंदोलनातून विरोध दर्शवावा असे आवाहन माजी आमदार स्मिता वाघ यांनी केले. राज्यातील सरकार हे वसुली सरकार असून, जनतेच्या पैशांवर डल्ला मारण्याचे काम राज्य शासनाकडून होत असल्याचा आरोप आमदार संजय सावकारे यांनी केला.
भाजपा पदाधिकाऱ्यांनी फिरवली पाठ
या मेळाव्याला भाजपच्या जिल्हाभरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचा सूचना पक्षाकडून देण्यात आल्या होत्या. मात्र, जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी या बैठकीला अनुपस्थिती राहिल्याने पक्षाच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times