संभाजी भिडे यांच्या शिवप्रतिष्ठान संघटनेने इंदुरीकर यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल झाल्यास त्याविरुद्ध रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते नितीन चौगुले यांनी दिला आहे. त्यामुळे इंदुरीकर महाराज विरोधक आणि समर्थक असा वाद येत्या काळात चिघळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे. त्यानंतर आज भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनीही तशीच मागणी करत नगर गाठले. नगरच्या पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन देसाई यांनी इंदुरीकर महाराजांविरोधात लेखी तक्रार दिली. इंदुरीकर यांच्याविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा, इंदुरीकरांना काळे फासू, असा इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे वातावरण अधिकच तापले आहे.
इंदुरीकरांची माफी
‘सम तिथीला स्त्री संग केला तर मुलगा होतो, विषम तिथीला स्त्री संग झाला तर मुलगी होते’, असे विधान इंदुरीकर यांनी कीर्तनादरम्यान केले होते. या विधानावरून वादाला तोंड फुटल्यानंतर आठ दिवसांनंतर आज इंदुरीकरांनी एक पत्रक काढून माफी मागितली आहे. माझ्या अभ्यासानुसार मी जे काही बोललो त्याचा मीडियाने विपर्यास केला आहे. तरीही माझ्या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असे नमूद करत इंदुरीकर यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times