वाचा:
जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या करोना आढावा बैठकीत पालकमंत्र्यांनी ऑनलाइन पद्धतीने सहभाग घेतला. यावेळी ते म्हणाले, केंद्राच्या सल्लागार समितीनेही राज्य सरकारला ‘डेल्टा प्लस’ विषाणूच्या बाबतीत सावध राहण्याच्या सूचना केल्या आहेत. यामुळे मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंग ही त्रिसूत्री टाळून चालणार नसल्याचा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला. जिल्ह्यातील स्थितीचा आढावा घेताना जिल्हाधिकाकारी म्हणाले की, सुदैवाने नाशिकमध्ये अद्याप ‘डेल्टा प्लस’ विषाणूचे रुग्ण आढळले नाहीत. तरीही, दक्षता म्हणून पाच टक्के नमुनेदेखील जीनोम सीक्वेन्सिंगसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. याशिवाय सलग तीन दिवसांपासून जिल्ह्यातील रुग्णसंख्येत वाढ होत असून, ही बाब चिंता वाढविणारी आहे. यामुळे सध्या तरी कोणतेही निर्बंध शिथील केले जाणार नाहीत. नागरिकांनीही विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन पर्यटनासाठी फिरू नये. दुपारी चार वाजेनंतर संचारबंदीचे काटेकोरपणे पालन करावे. नियम मोडणाऱ्यांवर कारवाईच्या सूचनाही संबंधित विभागांना देण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसह महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, पोलीस आयुक्त , जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त दुष्यंत भामरे, मालेगाव महानगरपालिकेचे आयुक्त भालचंद्र गोसावी, नाशिक महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण अष्टीकर, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी वासंती माळी, म्युकरमायकोसिस टास्क फोर्सचे डॉ. संजय गांगुर्डे आदी ऑनलाइन पद्धतीने बैठकीस उपस्थित होते.
वाचा:
ऑक्सिजन निर्मितीला चालना
जिल्हा ऑक्सिजन साठ्याबाबत स्वयंपूर्ण असणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्ह्यात लिक्विड मेडिकल ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित करण्यात यावेत. त्याचप्रमाणे रुग्णालयात खाटांची उपलब्धता, ऑपरेशन थिएटर, आवश्यक औषधसाठा या गोष्टींकडे लक्ष देऊन त्यांची तातडीने पूर्तता होण्यासाठी प्रयत्नपूर्वक नियोजन करण्यात यावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी पोलिस आयुक्त, नाशिक महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आपल्या कार्यक्षेत्राची माहिती सादर केली.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times