म. टा. विशेष प्रतिनिधी

मुंबई : बॉलिवूडच्या सिनेमांचे समीक्षण करण्याची सवय असलेला निर्माता-अभिनेता (केआरके) याच्याविरोधात आता अभिनेता सलमान खानच्या याचिकेवरून शहर दिवाणी न्यायालयाने मनाई आदेश काढला आहे. आणि त्याचे कुटुंबीय व त्याचे चित्रपट याविषयी सोशल मीडियावर काहीही बेछूट बदनामीकारक विधाने व व्हिडीओ प्रसिद्ध करण्यास न्यायालयाने बुधवारी अंतरिम आदेशाद्वारे केआरकेला मनाई केली.

वाचा:

यापूर्वी सिनेनिर्माते वाशू भगनानी यांच्याविरोधात ट्विटर व युट्यूबवर वारंवार बदनामीकारक मजकूर पोस्ट करत असल्याबद्दलही मुंबई उच्च न्यायालयाने त्याला आदेशाद्वारे सक्त मनाई केली होती. ‘प्रतिष्ठा ही आयुष्यातील पवित्र संपत्ती असते. जीवनात त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. व्यक्तिगत स्वरुपाच्या या प्रतिष्ठेला कोणी धक्का पोचवत असेल तर त्या व्यक्तीसाठी ते मोठे नुकसान असते’, असे सलमान खानला दिलासा देणाऱ्या अंतरिम आदेशात अतिरिक्त सत्र न्यायाधीश सी. व्ही. मराठे यांनी नमूद केले.

वाचा:

‘राधे’ चित्रपटाचे समीक्षण करताना केआरकेने माझ्यावर व माझ्या कुटुंबियांविषयी व्यक्तिगत स्वरूपाची बदनामीकारक विधानेही केली, असा आरोप सलमानने दाव्यात केला आहे. ‘चित्रपटाचे समीक्षण व त्यातील कामाविषयी टीका करण्यास काहीच हरकत नाही. मात्र, केआरकेने सलमानवर व्यक्तिगत स्वरूपाचे आरोप लावले. केआरकेकडून ट्विटर व अन्य सोशल मीडियाचा सातत्याने गैरवापर होत असून तो वारंवार असे गुन्हे करत आहे. यापूर्वीही केआरकेने सलमान व त्याच्या कुटुंबियांची बदनामी करणारे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत’, असे अॅड. प्रदीप गांधी यांनी युक्तिवादात मांडले. तर, ‘केआरकेने केवळ ‘राधे’ चित्रपटाविषयी आपला अभिप्राय नोंदवला. त्याअनुषंगाने त्याच्या विधानांकडे पाहिल्यास त्या माध्यमातून सलमानची प्रतिमा मलीन होण्याचा प्रकार घडलेला नाही. केआरकेला त्याचे विचार मांडण्याचा मूलभूत हक्क आहे’, असा युक्तिवाद केआरकेतर्फे अॅड. मनोज गडकरी यांनी मांडला. मात्र, ‘केआरकेचे ट्विट्स पाहता ते चित्रपटाशी संबंधित नसून सलमानला गुन्हेगार, लबाड व प्रतिष्ठा नसलेली व्यक्ती असल्याचे दाखवून त्याची प्रतिमा मलीन करण्याचा स्पष्ट प्रयत्न दिसतो’, असे निरीक्षण न्यायाधीशांनी सुनावणीअंती नोंदवले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here