अहमदनगर: दूध डेअरी चालकाने कामावरून काढले आणि कामाचे पैसे दिले नाहीत, म्हणून एका कर्मचाऱ्याने तीन वेळा डेअरीत आग लावली. यातून सुमारे सात लाख रुपयांचे नुकसान झाले. मात्र, आरोपी सापडत नव्हता. जेव्हा तिसऱ्यांदा आग लागली, तेव्हा पोलिसांनी कसून तपासणी केली असता हा प्रकार कामावरून काढून टाकलेला कर्मचारी करीत असल्याचे उघड झाले. त्याला अटक करण्यात आली आहे.

तालुक्यातील गणेशवाडी येथील सॉलिसिटर डेअरीत हा प्रकार घडला. पोलिसांनी राहुल सत्यवान मोरे (रा. खेड ता. कर्जत, जि. ) याला अटक केली आहे. या डेअरचे सुपरवायजर नितीन नवनाथ वाघमारे (रा. पिंपरी चिंचवड, पुणे, हल्ली रा. गणेशवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, १४ जून रोजी रात्री कोणी तरी सॉलिसिटर डेअरी या प्लॅन्टच्या बंगल्यातील ऑफिस, स्टोअर रूम व जनरेटर रुममधील साहित्यास आग लावली. त्यामुळे सुमारे सात लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. यापूर्वीही एकदा दुचाकी आणि एकदा किरकोळ साहित्य जाळण्यात आले होते. यासंबंधीही पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

तेव्हापासून पोलिस शोध घेत होते. मात्र, आरोपी सापडत नव्हता. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश माने, पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ यांनी गणेशवाडी येथे घटनास्थळी भेट दिली. सलग तीन वेळा प्रकार घडला. आरोपी मालकाच्या लक्षात येत नाही, पोलिसांनाही सापडत नाही, असे का होत आहे, हे जाणून घेण्यासाठी त्यांनी बारकाईने पाहणी केली. घटनास्थळाची पाहणी केली असता जिथे आग लागली, तिथे नवख्या व्यक्तीला येणे शक्य नसल्याचे आढळून आले. त्यामुळे कोणी तरी माहीतगार व्यक्तीनेच हा गुन्हा केल्याचा पोलिसांना संशय आला. त्यादृष्टीने पोलिसांनी चौकशी सुरू केली. कामगारांकडेही चौकशी करण्यात आली. तेथे १४ कामगार आहेत. त्यातील राहुल सत्यवान मोरे याला काही काळापूर्वी कामावरून काढून टाकल्याची माहिती पोलिसांना मिळाली. याशिवाय घटना घडली, त्या रात्री मोरे त्या परिसरात दिसल्याचीही माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांनी मोरे याच्यावर लक्ष केंद्रित केले. त्याला घरी जाऊन ताब्यात घेण्यात आले. पोलीस ठाण्यात आणून त्याच्याकडे कसून चौकशी करण्यात आली. त्यावर त्याने गुन्ह्याची माहिती दिली. त्याने सांगितले की, ‘आपण या डेअरीत कामाला होतो. नंतर काढून टाकण्यात आले. कामाचे पैसेही देण्यात आले नाहीत. या रागातून आग लावली.’ पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here