म. टा. वृत्तसेवा, सिंधुदुर्ग

‘नागरिकत्व दुरुस्ती कायदाला (सीएए) राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या महाविकास आघाडीतील घटक पक्षांचा विरोध असताना, यांनी मात्र, ‘या कायद्याला आपला विरोध नाही’, याचा ठाम पुनरुच्चार केला आहे. मंगळवारी सिंधुदुर्ग दौऱ्यात ओरोस येथे त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली.

‘ आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) हे दोन वेगळे विषय आहेत. राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) हा तिसरा विषय आहे. सीएए लागू झाला तरी आपल्याला घाबरण्याचे कारण नाही. एनआरसी हा आलेला नाही, तो येणारही नाही. कारण, एनआरसी लागू केला तर मुस्लिमांनाच नव्हे तर, हिंदू, आदिवासी आणि इतर वंचितांनाही तो त्रासदायक ठरेल. एनपीआर ही जनगणना आहे. ती दर दहा वर्षांनी होते आणि त्यामुळे कुणालाही त्रास होणार नाही, असे मला वाटते’, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ओरोस येथे शिवसैनिकांच्या मेळाव्यात आणि त्यानंतरच्या पत्रकार परिषदेतही म्हणाले.

देशातील अनेक राज्यांत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करण्यात येत आहे. ठिकठिकाणी निदर्शने सुरू आहेत. दिल्ली, राजस्थान, महाराष्ट्रासह अनेक राज्यांत मुस्लिम समाजातील महिला हा कायदा मागे घेण्यात यावा, यासाठी आंदोलन करत आहेत. दिल्लीच्या शाहीनबागमध्ये तर दोन महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. केरळ, पंजाब, राजस्थान आणि पश्चिम बंगाल या बिगरभाजपशासित राज्यांमध्ये नागरिकत्व कायद्याविरोधात तेथील विधानसभेत प्रस्तावही मंजूर करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातही यावर जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्यात या मुद्द्यावरून एकमत होताना दिसत नसल्याचे मंगळवारी पुन्हा दिसून आले.

‘नाणार’ला विरोधच

वृत्तपत्रातील जाहिरातीवर पक्षाची भूमिका ठरत नसते. नाणारमधील प्रकल्पाला पक्षाचा विरोध कायमच आहे. ‘सामना’तील जाहिरातीचा आमच्या भूमिकेशी काहीही संबंध नाही, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

कोरेगाव-भिमा, एल्गार वेगळे

‘कोरेगाव भिमा आणि एल्गार परिषद या दोन भिन्न गोष्टी आहेत. कोरेगाव भिमा प्रकरणाचा तपास राज्य सरकारच करणार आहे. कोणत्याही परिस्थितीत दलित बांधवांवर अन्याय होणार नाही याची खबरदारी घेण्यात येईल’, असे उद्धव म्हणाले.

सिंधुदुर्गात १ मे रोजी विमान

सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावर १ मे रोजी विमान उतरणार आहे, असेही उद्धव यांनी स्पष्ट केले.

‘नागरिकत्व’ला राष्ट्रवादीचा विरोध कायम

‘नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची स्वत:ची भूमिका असू शकते, मात्र, या कायद्यास राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध असून, लोकसभेत या पक्षाने त्याविरोधात मतदान केले आहे’, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी स्पष्ट केले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here