पुण्यातील नव्या पक्ष कार्यालयास शरद पवार यांनी आज भेट दिली. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. ‘ईडीनं अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या कारवाईत नवीन काहीच नाही. अशी कारवाई होणारे ते पहिले नाहीत. मुळात ईडी वगैरे यंत्रणा आमच्यासाठी नवीन नाहीत. याआधीही अनेकांबाबत केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर झाला आहे. या छाप्यांना फार महत्त्व देण्याची गरज नाही. यापूर्वीही अनिल देशमुख यांची केंद्रीय तपास यंत्रणांनी चौकशी केली आहे. त्यांच्या मुलाच्या व्यवसायाचीही चौकशी झाली आहे. त्यात त्यांच्या हाती काही लागले नाही. आताही काही लागणार नाही. त्यामुळं आम्हाला याबाबत अजिबात चिंता वाटत नाही,’ असं शरद पवार म्हणाले.
वाचा:
पवार यांनी यावेळी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. ‘जो विचार आपल्याला मान्य नाही, तो विचार दडपण्याचा प्रयत्न ईडी सारख्या तपास यंत्रणांच्या माध्यमातून होत आहे. हे अनेक राज्यात होत आहे. केंद्राची सत्ता यांच्या हातात आल्यापासून हे सगळं सुरू आहे. लोकांनीही ते माहीत असून ते सुद्धा त्याची गांभीर्याने नोंद घेत नाहीत, असंही पवार म्हणाले.
चंद्रकांत पाटील यांना टोला
अँटिलिया प्रकरणी अटकेत असलेल्या सचिन वाझे याने केलेल्या आरोपांवरून अजित पवार आणि अनिल परब यांची सीबीआय चौकशी करण्याच ठराव भाजपच्या राज्य कार्यकारिणीत गुरुवारी करण्यात आला होता. त्याबाबतही पवार यांनी भाष्य केलं. ‘ठराव करून चौकशीची मागणी करण्याची ही पहिलीच घटना आहे. चंद्रकांत पाटील हे मोठे कर्तृत्वान गृहस्थ आहेत. यापूर्वी कधीही झाल्या नाहीत, अशा गोष्टी करण्यात त्यांचा लौकिक आहे. त्यांच्या पुढाकारानं असं काही झालं असेल तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही,’ असा चिमटा पवारांनी काढला.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times