अहमदनगर पोलिस दलातील शहर वाहतूक शाखेतील पोलिस कर्मचारी गणपत घायतडक यांच्या पत्नी विमल यांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. घायतडक कुटुंब सरकारी पोलिस वसाहतीतील खोलीत राहते. २१ एप्रिल रोजी विमल यांना श्वसनाचा त्रास होऊ लागला. त्यामुळे तपासणी करण्यात आली. त्या काळात करोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरू होता. विमल यांना करोनाची बाधा झाल्याचे आढळून आले. त्यांचे वय ४५, त्यातच त्यांना सहव्याधीही होती. त्यांचे फुफ्फुसाचे स्कॅन केले असता फुफ्फुसात २५ पैकी २४ भाग करोना संसर्गाचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आले. त्यामुळे २४ एप्रिलला त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
याची माहिती मिळाल्यावर पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी डॉक्टरांशी आणि अन्य अधिकाऱ्यांशी संपर्कात राहून उपचारासंबंधी सूचना केल्या. घायतडक कुटुंबीयांना धीर दिला. डॉ. बापुसाहेब कांडेकर, डॉ. विजय निकम, डॉ. राहुल हिरे यांच्याशी संपर्कात राहून उपचारासंबंधी वेळोवेळी माहिती घेतली.
दरम्यानच्या काळात १० मे रोजी विमल यांची प्रकृती जास्तच खालावली. त्यांची ऑक्सिजनची पातळी ४५ पर्यंत खाली आली. सगळेच काळजीत पडले होते. अशात त्यांचा मुलगा नितीन त्यांना भेटायला आला. ‘आई, तू जगणार, तुला जगलेच पाहिजे. तू खंबीर आहेस,’ असं त्याने आईला सांगितलं. याच हिमतीवर विमल करोनाशी लढत राहिल्या. तब्बल ६३ दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यातील ५३ दिवस त्या व्हेंटीलेटरवर होत्या. आत्मविश्वास आणि इच्छाशक्तीच्या बळावर त्यांचा हा लढा यशस्वी झाला.
शुक्रवारी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्या बऱ्या होऊन परतल्या. त्यांच्या या जिद्दीला आणि डॉक्टरांच्या प्रयत्नांना सलाम करण्यासाठी पोलिस अधीक्षक मनोज पाटील स्वत: रुग्णालयात पोहचले. त्यांनी उपचार करणाऱ्या डॉक्टरांचा गौरव केला. विमल घायतडक यांचा हा लढा इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचे यावेळी पाटील म्हणाले.
करोना योद्ध्यांचाही गौरव
लॉकडाऊनच्या काळात गुरुद्वारा भाई दयासिंगजी गोविंदपुरा यांच्यावतीने सुरू असलेल्या घर घर लंगर सेवेचाही पोलिस अधीक्षक पाटील यांनी यावेळी गौरव केला. घायतडक यांच्या पत्नी रुग्णालयात असताना त्यांची दोन मुले आणि पती यांना जेवणासाठी याच लंगर सेवेचा आधार मिळाला. त्याबद्दल प्रदीप पंजाबी, गुरुदयालसिंग वाही, महेश मदयान, हरजितसिंग वधवा, जनक आहुजा, राहुल बजाज, करण धुपा, सुनिल थोरात यांचा पाटील यांनी गौरव करून आभार व्यक्त केले.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times