म. टा. प्रतिनिधी, मुंबई

रेल्वे स्थानकांत प्रवाशांच्या सुविधेसाठी मोठ्या संख्यने सरकते जिने उपलब्ध करून दिले आहेत. मात्र, देखभाल-दुरुस्तीअभावी हा ‘सरकता’ प्रवास प्रवाशांसाठी धोकादायक ठरत असल्याचे सोमवारच्या घटनेवरून दिसून आले. अंधेरी स्थानकातील अचानक वर जाण्याऐवजी खालच्या दिशेने जाऊ लागल्याने प्रवासी एकमेकांवर आदळून त्यांतील दोघेजण किरकोळ जखमी झाले. अंधेरी रेल्वे स्थानकातील फ्लॅटफॉर्म क्रमांक ३ वरील सांताक्रूझ दिशेकडील सरकत्या जिन्याबाबत संध्याकाळी ऐन गर्दीच्या वेळी हा प्रकार घडला. वर जाणारा हा जिना अचानक एक धक्का बसून खालच्या दिशेने जाऊ लागल्याने ही दुर्घटना घडली.

अंधेरी रेल्वे स्थानकातील फ्लॅटफॉर्म क्रमांक ३ वरील सांताक्रूझच्या दिशेला सरकता जिना आहे. पुलावर जाण्यासाठी पायऱ्या चढण्याचा त्रास वाचवण्यासाठी या सरकत्या जिन्यांचा वापर हजारो प्रवाशांकडून करण्यात येतो. सोमवारी नेहमीप्रमाणे हा जिना सुरू होता. मात्र, अचानक धक्का बसून जिन्याचा उलट प्रवास सुरू झाला. सायंकाळची सव्वा सहाची वेळ असल्याने जिन्यावर बऱ्यापैकी गर्दी होती. जिना उलट दिशेने सुरू झाल्यामुळे त्यावरील प्रवासी एकमेकांवर आदळले. ‘या अपघातात माझ्या व मित्र राजकुमार उपाध्ये याच्या पायाला किरकोळ दुखापत झाली’, असे प्रत्यक्षदर्शी अमेय सवे याने सांगितले.

सरकत्या जिन्याचा प्रवास उलट दिशेने सुरू असतानाच चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण होण्यापूर्वी काही प्रवाशांनी प्रसंगावधान राखत जिना थांबवण्यासाठी आपत्कालीन बटण दाबले. परिणामी जिना त्वरीत थांबला. हा सर्व प्रकार अमेयने ट्वीटच्या माध्यमाने उघडकीस आणला. तसेच सरकत्या जिन्यांप्रकरणी ट्वीट आणि ‘रेल मदद’ अॅपच्या मदतीने ऑनलाइन तक्रार नोंदवली. तक्रारींची तातडीने दखल घेत पश्चिम रेल्वेने संबंधित विभागाला तक्रार पाठवत यावर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले. पश्चिम रेल्वेवर विविध खासगी कंपनीचे सरकते जिने आहेत. यामुळे यांची देखभाल एकाच व्यक्ती अथवा कंत्राटदाराकडे देणे हे गैरसोईचे ठरते, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.

सदोष मोटर बदलण्याचे काम सुरू

सरकते जिने कार्यान्वित करणाऱ्या मोटरमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. यामुळे जिना उलट दिशेने सुरू झाला. मात्र, सुरक्षिततेसाठी वापरण्यात येणाऱ्या यंत्रणेच्या मदतीने जिना तातडीने थांबवण्यात आला. मोटरमध्ये बिघाड झालेले एकूण १७ सरकते जिने आहेत. भविष्यात या घटना टाळण्यासाठी सरकत्या जिन्यांच्या सदोष मोटर बदलण्याचे काम सुरू आहे, असे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी सांगितले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here