‘करोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत तिसऱ्या लाटेवर नियंत्रण कसे आणायचे या संदर्भात चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. या लाटेत जवळपास ५० लाख रुग्ण संक्रमित होतील, यामध्ये ५ लाख बालकांचा समावेश असेल,’ असा अंदाज डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज व्यक्त केला आहे. ते बुलडाणा येथील आढावा बैठकीनंतर माध्यमांसोबत बोलत होते.
सरकारची नेमकी काय तयारी सुरू आहे?
‘दुसऱ्या लाटेमध्ये आपल्याला ज्या काही अडचणी आल्या होत्या प्रामुख्याने ऑक्सिजनचा तुडवडा, काही ठिकाणी डॉक्टरांची तर काही ठिकाणी रेमडेसिवीरची अडचण होती. अर्थात या सगळ्या गोष्टीची साधक-बाधक चर्चा मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत झाली आहे. दुर्दैवाने तिसरी लाट आली तर महाराष्ट्र शासन हे ऑक्सिजन, इंजेक्शनपासून डॉक्टर आणि पॅरामेडिकल स्टाफ या सर्व बाबींची तयारी करत आहे,’ अशी माहिती राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे.
दरम्यान, करोनाची तिसरी लाट थोपवण्यात आपल्याला यश येईल, असा विश्वासही अन्न व औषध प्रशासनमंत्री राजेंद्र शिंगणे यांनी व्यक्त केला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times