मुंबई : मंत्रालयात आज दूध उत्पादक शेतकरी आणि संघटना यांच्या () आणि इतर विविध समस्यांबाबत महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर दुग्ध व्यवसाय विकास मंत्री यांनी मोठी घोषणा केली आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या एफआरपीच्या धर्तीवर राज्यातील कष्टकरी दूध उत्पादक शेतकऱ्यांना हमी भाव देण्याचा शासन प्रयत्न करणार आहे, अशी माहिती मंत्री सुनील केदार यांनी दिली आहे.

दूध दराबाबत मुंबईत झालेल्या बैठकीला आमदार सदाभाऊ खोत, माजी आमदार ॲड.अनिल बोंडे, डॉ.किरण लहामटे, महानंदचे अध्यक्ष रणजितसिंग देशमुख, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, महानंदचे व्यवस्थापकीय संचालक शामसुंदर पाटील, दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे आयुक्त एच पी तुम्मोड यांची प्रमुख उपस्थिती होती.

‘लगेच अभ्यास करून निर्णय घेणार’
‘राज्यात गेल्या दोन वर्षापासून लॉकडाऊनमुळे दूध दराचा प्रश्न सातत्याने निर्माण होत आहे. याकालावधीत शासनाने ग्रामीण भागातील कष्टकरी दूध उत्पादक शेतकरी यांना मदत करण्यासाठी जास्तीचे दूध खरेदी केले आणि त्याची पावडर तयार केली. १० लाख लिटर दूध खरेदी करण्याचे शासनाने उद्दिष्ट ठेवले होते. राज्यातील शेतकऱ्यांची या निर्णयामुळे लॉकडाऊनची तीव्रता कमी करण्यात शासनाला यश आले. दूध उत्पादक शेतकऱ्‍यांना एफआरपी लागू करण्यासाठी दूध उत्पादक शेतकरी प्रतिनिधी, शासकीय आणि खाजगी दूधसंघ यांच्या सूचना ऐकून घेतल्या आहेत. लगेचच याविषयीच्या सर्व बाजूंचा अभ्यास करण्यात येणार असून याबाबत निर्णय घेऊन अमंलबजावणीची प्रक्रिया करण्यात येणार आहे,’ असं सुनिल केदार यांनी म्हटलं आहे.

बैठकीत झाले इतरही महत्त्वाचे निर्णय; जाणून घ्या…
शेतकऱ्यांनी डेअरीला दूध दिल्याबरोबर पावती देण्याच्या आणि पावतीवरील मजकूर अंतिम करण्याच्या सूचना देण्यात येतील. पशुधनाच्या लसीकरणाला प्राधान्य देण्याबाबत संबंधित अधिकाऱ्‍यांना निर्देश देण्यात येतील. अधिकारी -कर्मचारी रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया अधिक गतीने करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे केदार यांनी सांगितलं आहे.

राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती करण्यासाठी ब्राझीलमधून शुद्ध गीर वंशाचे वळू जागतिक निविदा काढून खरेदी करण्यात येणार असून गीर वळू पासून वीर्य रेतमात्रा तयार करून त्याद्वारे राज्यात शुद्ध गीर प्रजातीचे पैदासीद्वारे शेतकऱ्‍यांचे व पर्यायाने राज्याचे दूध उत्पादन वाढण्यास मदत होणार आहे, असंही ते म्हणाले.

राज्यात शेतकऱ्‍यांकडील गाई-म्हशींमध्ये कृत्रिम रेतन कार्यक्रमासाठी लिंग विनिश्चित विर्यमात्रा (Sex Sorted Semen) वापर करून उच्च अनुवंशीकतेच्या कालवडी / पारड्यांची निर्मिती करण्यात येणार असून यामध्ये राज्यात आता ९० टक्के उच्च वंशावळीच्या मादी वासरांची निर्मिती होणार आहे. ही विर्यमात्रा फक्त ८१ रुपयांना उपलब्ध होणारा क्रांतिकारी निर्णय शासनाने घेतला असल्याची माहिती मंत्री सुनील केदार यांनी दिली.

पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार यांनी लोकप्रतिनिधी आणि दूध उत्पादक शेतकरी आणि संघांनी मांडलेल्या समस्येवर सविस्तर माहिती दिली.

दरम्यान, या बैठकीस किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले, रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शिवनाथ जाधव, दीपक भोसले, भानुदास शिंदे, पांडुरंग शिंदे, सुहास पाटील, शेतकरी नेते धनंजय धोरडे, उमेश देशमुख, खासगी दूध संघाचे प्रमुख दशरथ माने, प्रकाश कुतावळ बैठकीला उपस्थित होते.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here