: राज्यातील बहुतांश राजकीय पक्षांनी आगामी निवडणुकांची तयारी आतापासून सुरू करत पक्ष संघटनेला बळ देण्यासाठी दौऱ्यांचं आयोजन केलं आहे. अशातच परिवार संवाद यात्रेच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष ( Jayant Patil) हेदेखील राज्यातील विविध भागात जाऊन पक्ष कार्यकर्त्यांची भेट घेत आहेत. जंयत पाटील यांच्या या यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली असून आज ही यात्रा लातूरमध्ये होती. यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी पक्षविस्तारासाठी कार्यकर्त्यांना खास कानमंत्र दिला.

‘योग्य नियोजन, समन्वय साधून संघटनेला वेळ दिला तर आपण अपेक्षित ध्येय गाठू शकतो. संघटनेत जर मतभेद असतील तर ते आताच मिटवा आणि कामाला सुरुवात करा,’ असं आवाहन जयंत पाटील यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना केलं आहे.

जयंत पाटील यांनी ‘अपेक्षित ध्येय’ असा उल्लेख केल्याने आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची नेमकी रणनीती काय असणार, याविषयीची चर्चा रंगू लागली आहे.

या दौऱ्यात पाटील यांनी लातूर जिल्ह्यातील निलंगा व शिरुर अनंतपाळ विधानसभा मतदारसंघात आढावा बैठक घेतली. या बैठकीत ते म्हणाले की, सामान्य घरातली माणसं राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर जावू शकतात, ही लोकशाहीची ताकद आहे. त्याच तत्वावर आपला पक्ष जनसामान्यांमध्ये वाढू शकतो.

‘…तर तो परिवार कसला?’
‘राज्यात विविध समाजघटकांचे, पीक-बियांणांचे प्रश्न आहेत. हे प्रश्न जाणून घेण्यासाठीच हा परिवार संवाद दौरा आयोजित करण्यात आला आहे. आपल्या लोकांच्या मनात काय आहे, हे कळले नाही तर तो परिवार कसला. कुणावरही अन्याय झाला तर न्याय देण्याची खबरदारी आम्ही घेऊ,’ असंही या दौऱ्यावेळी पाटील यांनी म्हटलं आहे.

धनंजय मुंडेंचा भाजपवर निशाणा
जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली परिवार संवाद यात्रा मराठवाड्यात पोहोचल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हेदेखील सहभागी झाले होते. यावेळी कार्यकर्त्यांशी बोलताना त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपवर जोरदार टीका केली.

‘एकेकाळी आरक्षणाचा विरोध करणारे लोक आज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरत आहेत, यापेक्षा मोठी हास्यास्पद गोष्ट नाही,’ अशी खोचक टीका मुंडे यांनी भाजपच्या उद्या होणाऱ्या चक्का जाम आंदोलनावर केली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here