आपल्या शापामुळेचे महाराष्ट्र कॅडरचे आयपीएस अधिकारी करकरे ठार झाले, असं वक्तव्य प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी काही वर्षांपूर्वी केलं होतं. या वक्तव्यामुळे त्यांना आणि भाजपला मोठ्या टीकेचा सामना करावा लागला होता. त्यानंतरही प्रज्ञा सिंह यांच्या भूमिकेत कुठलाही बदल झालेला दिसत नाहीए. हेमंत करकरेंना आपण देशभक्त मानत नाही, असं प्रज्ञा सिंह ठाकूर म्हणाल्या आहेत. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.
करकरेंबद्दल काय म्हणाल्या प्रज्ञा सिंह ठाकूर?
‘हेमंत करकरे काही लोकांसाठी देशभक्त असतील. पण खरे देशभक्त हे वेगळा विचार करतात. माझ्याबद्दल माहिती मिळवण्यासाठी करकरेंनी आचार्य-शिक्षकाची बोटं आणि बरगड्या मोडल्या. मला खोट्या प्रकरणात गोवलं’, असं प्रज्ञा सिंह ठाकूर म्हणाल्या. ‘देशात १९७५ मध्ये पहिल्यांदाच आणीबाणी लागू झाली होती. पण २००८ मध्ये मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात मला अटक झाली तेव्हाही अशीच स्थिती होती’, असं प्रज्ञा सिंह ठाकूर म्हणाल्या. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर या आरोपी आहेत. या बॉम्बस्फोटात १० जण ठार तर ८२ जण जखमी झाले होते.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांचा पराभव केला होता. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेलाही देशभक्त म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून पंतप्रधान मोदींनीही टीका केली होती आणि प्रज्ञा सिंहला मनपासून कधीच माफ करू शकणार नाही, असं म्हणाले होते.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times