म. टा. प्रतिनिधी,

‘बाबा… पती, सासू व नणंद माझा छळ करतात. तू कुरूप दिसते. आता दुसरी मुलगी घरी आणावी लागेल, असे म्हणत मारहाण करतात. बाबा, असह्य झाला आहे. मी आता जगणार नाही,’ असे बोलून २६ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना जयप्रकाशनगर भागात घडली. याप्रकरणी सोनेगाव पोलिसांनी विवाहितेच्या पतीसह चौघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. किशोर कुमरे (वय ३५), त्याची आई लक्ष्मीबाई कुमरे दोन बहिणी पूनम कुमरे व पुष्पा मसराम, अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. रोशनी किशोर कुमरे (वय २६),असे मृताचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोर हा खासगी काम करतो. नऊ महिन्यांपूर्वी त्याचे रोशनीसोबत लग्न झाले. लग्नानंतर किशोर व त्याचे नातेवाइक रोशनीचा छळ करायला लागले. ती माहेरी गेली. नातेवाइकांनी मध्यस्थी केल्यानंतर रोशनी सासरी परतली. त्यानंतरही किशोर व त्याचे नातेवाइक रोशनीचा छळ करीत होते. १० फेब्रुवारीला किशोरने रोशनीला मारहाण केली. त्यानंतर रोशनीने वडिलांच्या मोबाइलवर संपर्क साधला. ‘बाबा मला खूप त्रास होत आहे. छळ असह्य झाला आहे. आता मी जगणार नाही,’असे ती वडिलांना म्हणाली. वडिलांनी रोशनीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. रोशनीने मोबाइल कट केला. पंख्याला ओढणी बांधून गळफास घेतला. याप्रकरणी सोनेगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला. तपासादरम्यान पती व त्याच्या नातेवाइकांच्या छळाला कंटाळून रोशनीने आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले. देवराव नारायणराव कंगाले (वय ५५,रा. सिंधी, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून सोनेगाव पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here