गडचिरोली : ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द केल्या प्रकरणी भारतीय जनता पार्टीतर्फे शनिवारी गडचिरोलीच्या इंदिरा गांधी चौकात आंदोलन करण्यात आले. याच दरम्यान काँग्रेसच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी पलटवार करीत समोरासमोर आंदोलन करत ‘मोदी सरकार हाय हाय’च्या घोषणा दिल्या. तेव्हा भाजपच्या कार्यकर्त्यांनीही राज्य सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली.

दोन्ही पक्षाकडून एकमेकांच्या आंदोलनाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाल्याने गडचिरोलीच्या इंदिरा गांधी चौकात चांगलेच राजकारण तापल्याचे चित्र दिसून आले. ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले याला राज्यातील महाविकास आघाडी सरकार जबाबदार नाही तर हे भाजपचेच पाप आहे, असा पलटवार कॉंग्रेसच्या महिला आघाडीच्या चंदा कोडवते यांनी केला.

केंद्रातील मोदी सरकार शेतकरी विरोधी असून ओबीसींची जनगणना न करण्याचा कटकारस्थान केंद्राकडून सुरू आहे. ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द करण्यात केंद्र सरकारच जबाबदार असून सरकारी नोकरी मधील पदोन्नतीमधील आरक्षणही रद्द झाले. मागासलेल्या समाजाला आरक्षण लागू असताना केंद्रातील मोदी सरकार आरक्षण विरोधी काम करीत आहे, असेही चंदा कोडवते यांनी यावेळी सांगितले. याविरोधात काँग्रेस पार्टी स्वस्थ बसणार नसून पुढेही आक्रमक रित्या आंदोलन उभारले जातील, असा इशारा यावेळी त्यांनी दिला.

दरम्यान, आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तसंच, मुंबईतही भाजपचे आमदार आणि विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्याचबरोबर, आमदार आशिष शेलार आणि मनोज कोटक यांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे. औरंगाबाद येथेही भाजपच्या चक्का जाम आंदोलनावेळी पोलिसांनी महिला मोर्चा प्रदेश अध्यक्ष उमा खापरे, खासदार डॉ भागवत कराड, आमदार अतुल सावे, शहराध्यक्ष संजय केणेकर यांच्या सह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात पुण्यातील कात्रज चौकात आंदोलन होत आहे. यावेळी ‘ओबीसींच्या पाठीशी भाजप खंबीर उभा असून आरक्षण लागू होईपर्यंत निवडणूका होऊ देणार नाही,’ असा इशाराच पंकजा मुंडे यांनी राज्य सरकारला दिला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात दाभोळकर कॉर्नर येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. भाजपनं केलेल्या आंदोलनामुळं काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here