पुणे: डेल्टा, डेल्टा प्लससारख्या व्हेरिएंटमुळं करोनाचा धोका वाढल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं जुन्या नियमावलीमध्ये बदल केल्यानंतर महापालिकेनंही सुधारीत आदेश काढले आहेत. त्यानुसार, पुण्यात सायंकाळी पाच वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली असून पाच वाजल्यानंतर संचारबंदी असेल. संचारबंदीच्या काळात पुणेकरांना केवळ अत्यावश्यक कारणासाठी घराबाहेर पडता येणार आहे. (Night Curfew in )

करोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचं वाटत असताना राज्यात करोनाच्या विषाणूचे नवे प्रकार समोर आले आहेत. रत्नागिरी, जळगावसह काही जिल्ह्यांत डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण आढळले असून कालच राज्यात डेल्टा प्लस बाधित रुग्णाचा पहिला मृत्यू झाला. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं शुक्रवारी नवे आदेश जारी केले. यापूर्वी टप्प्याटप्प्यानं अनलॉक करण्याचा निर्णय घेताना राज्य सरकारनं पाच स्तर जाहीर केले होते. पहिल्या स्तरावर असलेल्या जिल्ह्यांतील लॉकडाऊन संपूर्ण उठवण्यात आला होता. तर, दुसऱ्या स्तरावर असलेल्या जिल्ह्यांमध्ये बऱ्यापैकी मोकळीक देण्यात आली होती. मात्र, नव्या आदेशानुसार आता सर्व जिल्हे तिसऱ्या स्तराच्या वर असतील असं जाहीर करण्यात आलं आहे. हे नवे स्तर विचारात घेऊन अनेक जिल्ह्यांत व महापालिका क्षेत्रात सुधारीत आदेश काढले जात आहेत.

वाचा:

पुणे महापालिकेनं निर्बंध कठोर करत महापालिका क्षेत्रात जमावबंदी लागू केली आहे. त्यानुसार पाच पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. तर, सायंकाळी पाच नंतर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या काळात अत्यावश्यक कारणाशिवाय कोणालाही बाहेर पडता येणार नाही. सरकारनं ठरवून दिलेल्या निकषांनुसार, ठराविक कालावधीनं आढावा घेऊन निर्बंध कमी जास्त केले जातील, असं महापालिकेनं स्पष्ट केलं आहे.

असे असतील निर्बंध:

  • अत्यावश्यक सेवेतील दुकाने आठवड्यातील सर्व दिवस चार वाजेपर्यंत सुरू राहणार
  • अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने शनिवार, रविवारी पूर्ण बंद राहणार. इतर दिवशी चार वाजेपर्यंत सुरू राहणार.
  • सार्वजनिक बस सेवा ५० टक्के क्षमतेनं सुरू राहणार. उभ्यानं प्रवासास परवानगी नाही.
  • मॉल, सिनेमागृहे, नाट्यगृहे पूर्ण बंद राहणार
  • रेस्टॉरण्ट, बार, फूड कोर्ट सोमवार ते शुक्रवार दुपारी चार वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेनं सुरू राहणार. दुपारी चारनंतर पार्सल देता येणार. शनिवार, रविवार फक्त पार्सल सेवा देता येणार
  • मैदाने, उद्याने, वॉक, सायकलिंगला रोज सकाळी ५ ते सकाळी ९ या वेळेत मुभा
  • खासगी कार्यालये दुपारी चार वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेनं सुरू ठेवता येणार. शासकीय कार्यालये पूर्ण क्षमतेनं सुरू राहणार
  • आउटडोअर स्पोर्ट्स सकाळी ५ ते सकाळी ९ या वेळेत सुरू ठेवता येणार
  • महापालिका क्षेत्रातील सर्व धार्मिक स्थळे नागरिकांसाठी बंद राहणार.
  • सामाजिक, धार्मिक व मनोरंजनाचे कार्यक्रम फक्त ५० लोकांच्या उपस्थित साजरे करता येणार
  • लग्न समारंभासाठी ५० लोकांच्या उपस्थितीची अट राहील.
  • व्यायामशाळा, सलून, स्पा, ब्यूटी पार्लर दुपारी चार वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेनं चालवता येणार
  • मद्य विक्रीची दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी चारपर्यंत सुरू राहतील. शनिवार व रविवारी पार्सल सेवा देता येईल.
  • महापालिका क्षेत्रातील शाळा, महाविद्यालये १५ जुलैपर्यंत पूर्णपणे बंद राहतील.
  • खासगी कोचिंग क्लासेस, प्रशिक्षण संस्था बंद राहतील. ऑनलाइन शिक्षणास मुभा राहील.
  • पुणे कटक मंडळ आणि पुणे खडकी मंडळाला देखील नवे आदेश लागू राहतील.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here