: ‘मी छत्रपती आहे, मी कसा मॅनेज होईन’ असा सवाल करत () यांनी आरक्षणाच्या लढाईसाठी स्टंटबाजी करण्याची गरज नसल्याचा टोला लगावला आहे. आंदोलन करताना, मोर्चा काढताना जरा आजुबाजूला करोनाची काय स्थिती आहे, याचे भान ठेवा असा सल्लाही त्यांनी मराठा आरक्षणाप्रश्नी ठोक मोर्चा काढण्याचा इशारा दिलेल्या संघटनांना दिला आहे.

खासदार संभाजीराजे यांनी मराठा समाजाच्या प्रश्नावर मूक आंदोलन सुरू केल्यानंतर सरकारने त्यांच्या बहुतांशी मागण्या मान्य केल्या. यामुळे सदर मागण्यांची पूर्तता करण्यासाठी संभाजीराजे यांनी एक महिन्यासाठी आपलं आंदोलन स्थगित केलं. त्यामुळे काहींनी त्यांच्यावर मॅनेज झाल्याचा आरोप केला. त्याचे खंडन करताना संभाजीराजेंनी आरक्षणासाठी आपला लढा सनदशीर मार्गाने सुरूच राहील, असं स्पष्ट केलं आहे.

कोल्हापुरातील भवानी मंडप येथे मराठा समाजातील समन्वयकांच्या बैठकीत ते बोलत होते. राज्यात या पद्धतीने आणखी पाच ते सहा ठिकाणी बैठक घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

लोकांना नाहक त्रास कशासाठी द्यायचा?
आंदोलन स्थगित करण्याच्या निर्णयावर टीका झाल्यानंतर संभाजीराजेंनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. ‘मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर आपण आंदोलन सुरू केले. सरकार बरोबर झालेल्या चर्चेत बहुतांशी मागण्या मान्य करण्यात आल्या. कोल्हापुरात सारथीचे उपकेंद्र सुरू केले. अजून सात केंद्रे सुरू करण्यात येत आहेत. मागण्या मान्य होत असताना पुन्हा मोर्चे कशासाठी काढायचे? यापूर्वी ५८ मूकमोर्चे काढले आहेत. सरकारला समाजाच्या भावना कळाल्या आहेत. त्यामुळे पुन्हा तेच तेच कशासाठी? लोकांना नाहक त्रास कशासाठी द्यायचा,’ असा सवालही त्यांनी केला.

ते म्हणाले की, आरक्षण रद्द झाल्यानंतर सर्वजण एकमेकांवर आरोप करण्यात गुंतले होते. मूळ मुद्यावर कुणीच बोलत नव्हते. अशावेळी आपण सरकारला सर्व मागण्या मान्य करण्यास भाग पाडले. सरकारने फेरयाचिका दाखल केली आहे. आता आरक्षण मिळवण्यासाठी तणाव निर्माण करण्यात काहीही अर्थ नाही. स्टंटबाजी करण्यापेक्षा कायदेशीर मार्गाने लढा देण्याची गरज आहे.

ठोक मोर्चा काढण्याचा निर्णय भाजपसह इतर काहींनी घेतला आहे. याबाबत बोलताना संभाजीराजे म्हणाले, मोर्चा काढताना जरा आजू बाजूची परिस्थिती पाहा. देश करोनाच्या संकटात आहे. तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. अशावेळी परिस्थितीचे भान ठेवणे आवश्यक आहे. गर्दी न करता, नियमांचे उल्लंघन न करता, कोविडचे नियम पाळून यापुढेही आपला लढा सुरू राहील, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here