पुणे : करोनाच्या तिसऱ्या लाटेची ( Third Wave) शक्यता वर्तविण्यात येत असल्याने आषाढी वारीमध्ये ( 2021) मानाच्या पालख्यांबरोबर अन्य दिंड्यांना सहभागी करून घेण्याची वारकऱ्यांची मागणी विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी अमान्य केली आहे. त्यामुळे राज्य सरकारने निश्चित केलेल्या नियमांनुसार १० मानाच्या पालख्या या बसेसमधून पंढरपूरला नेण्यात येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

वारीच्या प्रस्थान सोहळ्यासाठी अन्य दिंड्यांच्या प्रमुख दोन प्रतिनिधींना सहभागी होण्यास परवानगी देण्याची मागणी वारकऱ्यांकडून करण्यात आली होती. आळंदीहून ४३०, देहूमधून ३३० आणि सासवड येथून ९८ दिंड्या सहभागी होत असतात. मात्र, करोनाच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त राव यांनी ही मागणी अमान्य केली आहे. त्यामुळे राज्य सरकारने निश्चित केलेल्या नियमांनुसार पालखी प्रस्थान सोहळा आणि वारी होणार आहे. याबाबतचे आदेश राव यांनी काढले आहेत.

करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने मंत्रिमंडळाने चर्चा करून निर्णय घेतला आहे. त्या नियमांनुसार वारी सोहळा होणार असल्याचं राव यांनी आदेशात नमूद केलं आहे.

राज्य सरकारच्या निर्णयानुसार, आळंदी ते पंढरपूर ही परंपरेप्रमाणे पायी करण्याऐवजी मानाच्या दहा पालख्या या बसेसमधून पंढरपूरला नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पालखी प्रस्थान सोहळ्याला आळंदी आणि देहू या ठिकाणी प्रत्येकी १०० जणांना, तर अन्य आठ ठिकाणी प्रत्येकी ५० वारकऱ्यांना उपस्थित राहता येणार आहे. पायी वारीची परंपरा खंडित होऊ नये, यासाठी वाखरी येथून दीड किलोमीटरपर्यंत पोलिस बंदोबस्तात पायी वारी जाणार आहे.

वेगवेगळ्या ठिकाणांहून आलेल्या १० पालख्या या वाखरी येथे एकत्र येणार आहेत. त्या पालख्यांबरोबर असणाऱ्याच वारकऱ्यांना पायी वारीमध्ये सहभागी होण्यास परवानगी असणार आहे. त्या काळात वाखरी परिसरात कलम १४४ लागू असणार आहे.

‘या’ १० पालख्यांना परवानगी
श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान (आळंदी, पुणे)
श्री संत तुकाराम महाराज संस्थान (देहू, पुणे)
श्री संत सोपानदेव महाराज संस्थान (सासवड, पुणे)
श्री संत चांगावटेश्वर महाराज देवस्थान (सासवड, पुणे)
श्री संत निवृत्ती महाराज संस्थान (त्र्यंबकेश्वर, नाशिक)
संत मुक्ताबाई संस्थान (मुक्ताईनगर, जळगाव)
श्री संत नामदेव महाराज संस्थान (पंढरपूर)
श्री संत एकनाथ महाराज संस्थान (पैठण, औरंगाबाद)

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here