नवी दिल्ली : भारतीय चाहत्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आली आहे. कारण भारताच्या खेळाडूंनी आता तब्बल तिसरे सुवर्णपदक पटकावले आहे. भारतीय तिरंदाजांनी विश्वचषक स्पर्धेत तिसरे सुवर्णपदक जिंकले असून त्यांच्यावर आता कौतुकाचा वर्षाव होत आहे.

भारतीय तिरंदाज दीपिका कुमारी आणि अतुन दान यांनी मिश्र सांघिक स्पर्धेत नेदरलँड्सचा पराभव केला आणि सुवर्णपदकाला गवसणी घातली. या सामन्यात भारताचे दीपिका आणि अतुन हे दोघे ०-२ अशा पिछाडीवर होते. पण त्यानंतर दीपिका आणि अतुन यांनी बहारदार खेळ केला आणि हा सामना ५-३ अशा फरकाने जिंकला. या सामन्यातील विजयासह दीपिका आणि अतुन यांनी सुवर्णपदकाला गवसणी घातली. भारतासाठी ही तिसरे सुवर्णपदक ठरले.

यापूर्वी भारताच्या स्टार तिरंदाजपटू दिपीका कुमारी, अंकिता भगत आणि कोमोलिका बारी यांनी महिलांच्या रिकर्व्ह प्रकारात मेक्सिकोवर दणदणीत विजय मिळवला. दीपिका, अंकिता आणि कोमलिका यांनी मेक्सिकोवर ५-१ असा दमदार विजय मिळवत सुवर्णपदक पटकावले. या विश्वचषक स्पर्धेत शनिवारी अभिषेक वर्माने कम्पाऊंड एकेरी स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली होती. भारतीय खेळाडूंना या स्पर्धेत अजूनही सुवर्णपदक जिंकण्याची संधी आहे. त्यामुळे या स्पर्धेत भारतीय खेळाडू किती सुवर्णपदक जिंकतात, याची उत्सुकता भारतीय चाहत्यांना नक्कीच असेल. त्यामुळे या स्पर्धेकडे आता चाहत्यांचे डोळे लागलेले असतील. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ऑलिम्पिक स्पर्धेपूर्वी भारताच्या खेळाडूंनी हे घवघवीत यश मिळवलेले आहे, याचा भविष्यात त्यांना नक्कीच फायदा होईल.

अतुन दास आणि दीपिका कुमारी यांनी गेल्यावर्षी लग्न केले आणि या ३० जूनला त्यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण होत आहे. या सुवर्णपदकाबाबत अतुन म्हणाला की, ” माझ्यासाठी सुवर्णपदक जिंकण्याचा अनुभव अविस्मरणीय असाच होता. पहिल्यांदा मी आणि दीपिका एकत्रपणे फायनलमध्ये खेळत होतो आणि आम्ही विजय साकारात देशासाठी सुवर्णपदक कमावले. देशासाठी चांगली कामगिरी करणे हे नेहमीच प्रेरणादायी ठरत असते. त्यामुळे या विजयाची गोडी काही औरच असते. ”

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here