: कार आणि दुचाकीची जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले असून ५ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. साताऱ्यातील विखळे ता- खटाव येथील मल्हारपेठ-पंढरपूर या राज्य मार्गावर देशमुख वस्तीनजीक ही घटना घडली. मृतांमध्ये मायणी येथील दुचाकीस्वार युवक आणि कारमधील लातूर जिल्ह्यातील एका व्यक्तीचा समावेश आहे.

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मल्हारपेठ-पंढरपूर या राज्य मार्गावरील विखळे गावच्या देशमुख वस्ती नजीक विखळेकडून मायणीकडे सुरज राजाराम माळी हा युवक दुचाकी घेऊन जात होता. त्याचवेळी समोरून कोल्हापूर येथे देवदर्शन घेऊन सय्यदपूर ता.देवनी,जि. लातूरकडे भरधाव जाणाऱ्या इर्टिगा कारने या दुचाकीस्वाराला भीषण धडक देत रस्त्याच्या बाजूच्या संरक्षण काठड्यास धडक दिली. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

या अपघातात दुचाकीस्वार युवक सुरज राजाराम माळी (वय २७ रा.मायणी,ता-खटाव,जि. सातारा) आणि कारमधील संतोष किसनराव बिरादार (वय ४०, रा.सय्यदपूर जि-लातूर) या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

दुसरीकडे, चारचाकी वाहनातील चालक महेश विठ्ठलराव जळकुटे, जोतिराम धनाजी बिरादार, सौदागर राजकुमार बिरादार, दत्तात्रय भीमराव बिरादार रा.सय्यदपूर ता.देवनी,जि-लातूर या चार व्यक्ती गंभीर जखमी झाल्या असून त्यांना सातारा येथे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. संदीप शामराव बिरादार रा.सय्यदपूर हे किरकोळ जखमी झाले आहेत.

दरम्यान, मायणी येथील मृत युवक सुरज राजाराम माळी याच्या अकाली निधनाने मायणी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सदर अपघाताची नोंद मायणी पोलिस दूरक्षेत्र येथे रात्री उशिरापर्यंत करण्याचे काम सुरू होते. याबाबत पीएसआय शहाजी गोसावी पुढील तपास करत आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here