अमरावती: महाराष्ट्र पोलीस दलात सेवा देणारे अनेक अधिकारी विदेशात जाऊन सेवा देत असल्याचे आपण ऐकून आहोत. मात्र एखाद्या पोलीस शिपायाला थेट विदेश सेवेत पाठवण्यात आल्याची घटना तशी विरळच. ग्रामीण पोलीस दलात शिपाई म्हणून कार्यरत असणाऱ्या विकास अंजिकर यांना ही संधी मिळाली आहे. त्यांची विदेशात प्रतिनियुक्तीसाठी निवड करण्यात आली आहे.

‘आयएएस, आयएफएस’ दर्जाच्या अनेक अधिकाऱ्यांना सेवा देण्यासाठी विदेशात पाठवले जाते. मात्र, अशाच प्रकारे सेवा देण्यासाठी अमरावती ग्रामीण पोलीस दलातील पोलीस शिपाई विकास अंजिकर यांना पाठविण्यात आले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. हरी बालाजी एन. यांनी दिली आहे. अधिकार्‍यांप्रमाणेच पोलीस दलातील प्रामाणिक व कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचाऱ्यांना विदेशात सेवा देण्यासाठी पाठविण्यात येते. याच योजनेअंतर्गत विकास अंजीकर यांना तीन वर्षांसाठी ‘फॉरेन डेप्युटेशन’वर पाठविण्यात आले आहे.

वाचा:

या संदर्भात सविस्तर माहिती देताना अमरावती ग्रामीण पोलीस दलाचे अधीक्षक डॉ. हरी बालाजी एन. म्हणाले, ‘पोलीस दलातील शिपायांना विदेशात सेवेची संधी मिळावी यासाठी ही योजना आहे. आतापर्यंत सेवा बजावताना वरिष्ठांकडून मिळालेले शेरे, सेवा व कार्याची माहिती घेऊन शिपायांची या सेवेसाठी निवड करण्यात येते. संबंधित कर्मचाऱ्याला दिल्ली येथील प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षण देण्यात येते व मुलाखत घेऊन अंतिम निवड होते. ही नियुक्ती तीन वर्षांसाठी असते. अमरावती ग्रामीण पोलीस दलाचे शिपाई पुढील तीन वर्ष विदेशात जाऊन ‘सिक्युरिटी असिस्टंट’ म्हणून सेवा देणार आहेत.

वाचा:

विदेशात जाऊन भारतमातेची प्रामाणिकपणे सेवा बजावण्याची संधी मला मिळाली ही खूप मोलाची गोष्ट आहे. याचे श्रेय ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. हरी बालाजी एन व माझे आई-वडील, पत्नी व कुटुंबीयांना आहे,’ अशी भावना अंजिकर यांनी व्यक्त केली. याविषयी अधिक माहिती देताना सायबर विभाग प्रमुख पोलीस उपनिरीक्षक विरेंद्र चौबे म्हणाले, ‘याआधी अमरावती पोलीस दलातील तीन पोलीस शिपायांनी विदेशात सेवा बजावली आहे. त्यात अश्विन यादव, प्रवीण वानखडे, योगेश करडीकर यांचा समावेश आहे. दक्षिण आफ्रिका, म्यानमार यांसारख्या देशात जाऊन ग्रामीण पोलीस दलातील कर्मचाऱ्यांनी आपली कार्यतत्परता दाखवून जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here