गडचिरोली जिल्ह्यात एकूण 1 हजार 858 शाळा आहेत. यात जिल्हा परिषदेची शाळा, अनुदानित शाळा आणि विनाअनुदानित शाळा यांचा समावेश आहे. कोरोना महामारी संकटामुळे सलग दुसऱ्या वर्षी सुद्धा विद्यार्थ्याविना शाळा सुरू होणार आहे. दहावी व बारावीला शिकविणाऱ्या शिक्षकांची उपस्थिती शंभर टक्के आणि उर्वरित शिक्षकांची उपस्थिती 50 टक्के असणार आहे.
ऑनलाईन शाळेचा मोजक्याच विद्यार्थ्यांना होणार फायदा, कारण…!
साधारण जून महिन्यात विद्यार्थ्यांसह पालकांना शैक्षणिक सत्राचे वेध लागत असतात. मात्र, करोना महामारी संकटामुळे या उत्सवात विरजण पडले आहे. ऑनलाईन शाळा सुरू होत असल्याने याचा फायदा मोजक्याच विद्यार्थ्यांना होणार आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांची स्मार्टफोन घेण्याची आर्थिक कुवत नसल्याने त्यांना अडचणीचे जाणार आहे. तसेच ग्रामीण भागात पुरेसे नेटवर्क नसल्याने मोबाईल असूनही त्याचा काहीच उपयोग होणार नाही. असे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे.
शाळा व विद्यार्थ्यांना लागणाऱ्या साहित्याची विक्री करण्यासाठी शहरातील व्यावसायिक मोठ्या आशेने साहित्य उपलब्ध केले आहेत. मात्र, हे साहित्य घेण्यासाठी विद्यार्थी व पालक यांचा फारसा प्रतिसाद दिसून येत नाही. त्यामुळे व्यवसायिक अडचणीत सापडले आहेत. शाळा सुरू नसल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी सध्या खरीप हंगामातील शेती कामे सुरू असल्याने त्या कामावर जात आहेत.
वडिलांना शेती कामात मदत करीत आहेत. पालक मुलांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी चिंतेत दिसून येत आहेत. विद्यार्थी व पालक या वर्षी तरी किमान प्रत्यक्ष शाळा सुरू होऊन शाळेत जातील, अशी आशा केली होती. या आशेवर करोनाचे संकट दिसून येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक भवितव्य अधांतरी आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times