मुंबई : करोना रुग्णसंख्येत होणारी वाढ, डेल्टा प्लसचे आढळलेले रुग्ण यामुळं राज्य सरकारने अनलॉकबाबत सावध पावलं उचलली आहेत. त्यामुळं राज्यात कुठेही पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील नियमावाली लागू करता येणार नाही. सर्व जिल्ह्यांना तसेच महापालिकांना तिसऱ्या टप्प्यातील निर्बंधच लागू करावे लागणार आहेत. राज्यात आजपासून पुन्हा एकदा निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमिवर व्यापारी संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.

कोरोनाचा धोका वाढू नये म्हणून निर्बंध पुन्हा कडक करण्यात आले असून अत्यावशक सेवा आणि दुकानं उघडण्याला परवानगी देण्यात आली आहे. असं असलं तरी कोल्हापूरमध्ये व्यापारी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेत काहीही केलं तरी दुकानं उघडणार असल्याचा निर्णय घेतला आहे. एकीकडे दुकानं उघडल्यास कठोर कारवाई करणार असल्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

तर दुसरीकडे व्यापारी संघटना संतापल्या असल्याने कोल्हापूरमध्ये व्यापारी विरुद्ध प्रशासन असा वाद वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, नागपूरमध्येही व्यापारी संघटनांनी आक्रमक निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे. आजपासून बाजारपेठा हे ४ वाजेपर्यंतच खुल्या असणार आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये नाराजी आहे.

नागपूरमध्ये महापालिका व जिल्हा प्रशासनाने बाजारपेठा खुल्या ठेवण्यासंबंधी नव्याने नियमावली जारी केली आहे. यानुसार आता पुन्हा एकदा सोमवार ते शुक्रवार अत्यावश्यक वस्तू व सेवांसह अत्यावश्यक नसलेल्या सेवांची दुकाने सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत खुली राहू शकतील. तर शनिवार व रविवारी केवळ अत्यावश्यक सेवांचीच दुकाने दुपारी चारपर्यंत सुरू राहतील. शहरातील निर्बंध काहीच दिवसांपूर्वी शिथिल करण्यात आल्याने बाजारपेठा रात्री ८ तर हॉटेले-रेस्टॉरंट रात्री ११ वाजेपर्यंत सुरू होते. दरम्यान, हॉटेलमधून पार्सल सुविधा दुपारी ४ वाजेनंतरही सुरू राहणार आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here