‘सम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगा होतो, तर विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते,’ असं वक्तव्य इंदोरीकर महाराजांनी ओझर येथे झालेल्या एका कीर्तनात केलं होतं. त्यावरून संपूर्ण महाराष्ट्रात वादळ निर्माण झालं होतं. हे प्रकरण वाढत असल्यामुळे अखेर सात दिवसानंतर इंदोरीकर महाराजांनी लेखी माफीही मागितली होती. इंदोरीकरांनी माफी मागितल्यानंतर सिंधुताई सपकाळ यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. इंदोरीकरांचं योगदान फार मोठं आहे. त्यांनी प्रबोधनातून तरुणांना वाईट मार्गातून बाजूला करत स्वाभिमानाने जीवन जगण्याचा मूलमंत्र दिला आहे. त्यांनी वाईट-रुढी परंपरा जाव्यात म्हणूनही प्रयत्न केले आहेत. अशावेळी त्यांच्याकडून एखादं चुकीचं वाक्य गेलं असेल तर त्याचं भांडवल करण्याची गरज नाही. इंदोरीकरांनीही आपण चुकलो असं म्हणत आपलं कार्य सुरू ठेवावं, असा सल्ला सिंधुताईंनी दिला आहे.
इंदोरीकरांना सल्ला देतानाच सिंधुताईंनी इंदोरीकरांच्या टीकाकारांना कानपिचक्याही दिल्या आहेत. टीकाकारांनीही महाराजांच्या शब्दाला धरुन न बसता त्यांच्या चांगल्या कार्याची दखल घेऊन वाद मिटवता घ्यावा, असं सिंधुताईंनी म्हटलं आहे. दरम्यान, माझ्या अभ्यासानुसार मी जे काही बोललो त्याचा मीडियाने विपर्यास केला आहे. तरीही माझ्या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असं म्हणतं इंदोरीकरांनी काल माफी मागितली होती. तर भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी त्यांच्याविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. गुन्हा दाखल न झाल्यास, इंदुरीकर महाराजांच्या तोंडाला काळे फासू, असा इशारा त्यांनी दिला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times