वाचा:
सुप्रिया सुळे यांनी आज सकाळीच हडपसर येथील रामटेकडी कचरा प्रकल्पाची पाहणी करून माहिती घेतली. तसंच, महापालिकेसमोर आंदोलन करणाऱ्या आंबिल ओढा परिसरातील नागरिकांची भेटही घेतली. सुळे यांनी जमिनीवर बसूनच येथील महिलांशी संवाद साधला. त्यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी अजित पवार मुर्दाबाद, महाविकास आघाडी मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या. या कार्यकर्त्यांना सुप्रिया सुळे यांनी संयम राखण्याचं व राजकारण न करण्याचं आवाहन केलं. ‘मी इथं राजकारण करण्यासाठी आलेले नाही. हा प्रश्न संवेदनशीलपणे सोडवणं गरजेचं आहे,’ असं त्या म्हणाल्या. त्यानंतर कार्यकर्ते शांत झाले. महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं पाडलेली स्थानिकांची घरं बांधून देण्यात यावीत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
काय आहे आंबिल ओढा प्रकरण?
आंबील ओढ्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणं करण्यात आली असून ओढ्यामध्ये भर टाकून बांधकामं करण्यात आली आहेत. त्यामुळं पावसाळ्यात आसपासच्या परिसरात पाणी तुंबते. तसंच, मोठं नुकसान होतं, असं कारण देत मागील आठवड्यात महापालिकेनं येथील अतिक्रमणांवर कारवाई सुरू केली होती. या कारवाई दरम्यान काही घरेही पाडण्यात आली. महापालिका कोर्टानं स्थगिती दिल्यानं ही कारवाई मध्येच थांबवण्यात आली असली तरी अनेक कुटुंब रस्त्यावर आली आहेत. या कुटुंबांनी आज महापालिकेसमोर धरणं आंदोलन केलं. सुप्रिया सुळे यांनी महिला आंदोलकांची भेट घेत त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times