पुणे : पुणे शहरातील कचरा प्रश्नावरून आक्रमक भूमिका घेत राष्ट्रवादीच्या खासदार (NCP MP Supriya Sule) यांनी कचऱ्याबाबत झालेल्या खर्चाची ईडीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली. सुप्रिया सुळेंच्या या मागणीवर शहराचे महापौर (Pune Mayor Murlidhar Mohol) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

‘सुप्रियाताई, आम्ही कोणत्याही चौकशीला तयार आहोत. पुणे महापालिका निवडणुका जवळ आल्याने सुप्रियाताईंना पुण्याच्या कचरा प्रश्नाची आठवण झाली असून त्यांनी कचऱ्यासाठी झालेल्या खर्चाची चौकशी ED मार्फत करण्याची मागणी केली आहे. सुप्रियाताईंनी ED मार्फत चौकशीची मागणी करणे म्हणजे त्यांचा केंद्रीय तपास यंत्रणांवर पक्का विश्वास आहे, हे मी मानतो आणि त्याचं स्वागत करतो. अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांच्या ED चौकशी बाबतीतही सुप्रियाताईंनी हाच विश्वास कायम ठेवावा,’ असा टोला मुरलीधर मोहोळ यांनी लगावला आहे.

अजित पवारच नेतृत्व करत असल्याचं सांगून पकडलं कात्रीत!
कचरा प्रश्नावरून भाजपवर टीका करणाऱ्या सुप्रिया सुळे यांना कात्रीत पकडत मोहोळ यांनी वेगळाच सवाल केला आहे. ‘सुप्रियाताई यांची खासदारकीची यंदा तिसरी टर्म आहे. २०१४ पर्यंत आणि २०१९ नंतर त्यांचे बंधू मा. अजितदादा यांनी सातत्याने पुण्याचे नेतृत्व केले आहे. तरीही पुण्याचा कचरा प्रश्न सोडवण्यात यश आलेलं नाही, असेच त्यांना म्हणायचे आहे का?’ असा सवाल मुरलीधर मोहोळ यांनी केला आहे.

‘सुप्रिया सुळे यांनी माहिती घ्यावी’
‘गेल्या ४ वर्षात आम्ही कचरा व्यवस्थापनाबाबत केलेल्या प्रयत्नांची दखल राष्ट्रीय पातळीवर सातत्याने घेतली जात आहे. अगदी कालच पुण्याच्या Waste Managment ची दखल केंद्राने घेतली. कचरा प्रक्रिया करण्यासाठी ६ नवे प्रकल्प हे आमच्याच काळात म्हणजे गेल्या चार-साडेचार वर्षांत सुरू झाले. भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात पुणे महानगरपालिका आल्यानंतर पुणे शहराच्या कचरा प्रक्रियेची क्षमता १२०० मेट्रिक टनावरून १८०० मेट्रिक टनापर्यंत वाढवली गेली. याचीही माहिती महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने शहरात ‘एक्टिव्ह’ होत असलेल्या सुप्रियाताईंनी घ्यावी. आपल्या पक्षाने तर अनेक सुरू होणारे प्रकल्प तोडफोड करून जाळपोळ करून बंद पाडले. मात्र केवळ महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन कचऱ्यावर झालेल्या खर्चाची मागणी करणे म्हणजे ताईंनी स्वतःच्याच अपयशावर शिक्कामोर्तब केले आहे,’ असा घणाघात महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here