सोलापूर : करोना विषाणूच्या धोक्यामुळे यंदाही सोहळ्याबाबत राज्य सरकारने निर्बंध लादले आहेत. मात्र सरकारच्या या निर्णयाला ह.भ.प. यांनी आव्हान दिलं आहे. वारकऱ्यांनी पायी दिंडी काढावी, असं आवाहन कराडकर यांनी केलं आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून आषाढी वारीदरम्यान तणाव निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सरकारने आधी वारकरी प्रतिनिधींशी चर्चेचे नाटक केले आणि आपला निर्णय कायम ठेवला. या वारीला किमान १०० मानकरी वारकऱ्यांसह संतांच्या पादुका जाव्यात अशी मानकऱ्यांची भावना होती. पण सरकारने एकतर्फी निर्णय लादला. त्यामुळे आम्ही बहुतांशी संप्रदाय प्रमुखांशी चर्चा करून पायी जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ३ जुलै रोजी होणार्‍या प्रस्थान सोहळ्यास वारकर्‍यांनी उपस्थित राहण्याचे अवाहन ह.भ.प. बंडातात्या कराडकर महाराज यांनी केलं आहे.

बंडातात्या कराडकर महाराज यांच्या या निर्णयामुळे प्रशासनासमोर कायदा-सुव्यवस्थेचं मोठं आव्हान उभा राहणार आहे.

आपली भूमिका स्पष्ट करताना कराडकर यांनी ‘वाघ म्हटले तरी खातो अन वाघ्या म्हटलं तरीही खातोच’ म्हणूनच शासनाला अंगावर घेतलं, पाहिजे असं आवाहन वारकर्‍यांना समाज माध्यमातून केलं आहे. त्यामुळे आता वारकरी प्रमुख आणि सरकार यांच्यात वाद होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, वारीच्या प्रस्थान सोहळ्यासाठी अन्य दिंड्यांच्या प्रमुख दोन प्रतिनिधींना सहभागी होण्यास परवानगी देण्याची मागणी वारकऱ्यांकडून करण्यात आली होती. आळंदीहून ४३०, देहूमधून ३३० आणि सासवड येथून ९८ दिंड्या सहभागी होत असतात. मात्र, करोनाच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वीच विभागीय आयुक्त राव यांनी ही मागणी अमान्य केली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here