: करोनाची लागण होऊन आई-वडिलांचं निधन झाल्याने निराधार झालेल्या पाल्यास महाविद्यालयीन आणि विद्यापीठाची शैक्षणिक फी आणि परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची माहिती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली आहे.

सोमवारी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यासोबत राज्यातील कृषी विद्यापीठांच्या कुलगुरुंची ऑनलाइन बैठक झाली. या बैठकीमध्ये हा निर्णय झाल्याचे कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी सांगितले. सोलापूर विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालये आणि विद्यापीठ संकुलात शिक्षण घेणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळेल, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

या बैठकीमध्ये राज्यातील विविध भागांतील करोना परिस्थिती आणि शैक्षणिक वातावरण याचा मंत्री उदय सामंत यांनी आढावा घेतला. कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी सोलापूर जिल्ह्यातील परिस्थितीची माहिती दिली. शैक्षणिकदृष्ट्या ही बैठक अत्यंत सकारात्मक झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

सर्वप्रथम २० टक्के परीक्षा शुल्क माफ
राज्यात सर्वप्रथम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने परीक्षा शुल्कमाफीचा निर्णय घेतला आहे. करोना महामारीमुळे मागील वर्षाचे २० टक्के परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांना परत केले जाणार आहे. यंदाच्या वर्षी देखील शासनाच्या मार्गदर्शक सूचना व निर्णयाप्रमाणे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून फीबाबत विद्यार्थीहिताचा योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असंही कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी यावेळी बैठकीत सांगितले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here