: अमरावती येथील चांदूर बाजार परिसरातील शेतकरी सचिन रामेश्वर वाटाणे (वय ४० ) यांनी थेट तहसीलदार कार्यालयात विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. अनेकदा प्रयत्न करूनही शेतीसाठी लागणाऱ्या रस्त्याचा प्रश्न सुटत नसल्याने सचिन वाटाणे यांनी हे टोकाचं पाऊल उचललं आहे.

सचिन वाटाणे या शेतकऱ्याची बेलोरा शिवारात वडिलोपार्जित शेती आहे. वहिवाटेच्या रस्त्याची समस्या निकाली निघावी याकरिता त्यांनी तहसील कार्यालयात तक्रार दिली होती. मात्र या तक्रारीवर कुठलीच कारवाई होत नसल्याने २८ जून रोजी नायब तहसीलदार देवेंद्र सवई यांच्या कक्षात दाद मागण्यासाठी गेलेल्या सचिन यांनी तिथंच विष प्यायलं.

या घटनेनंतर गोंधळलेल्या नातेवाईक आणि गोपाल भालेराव यांनी शेतकऱ्याला तात्काळ ग्रामीण रुग्णालयात औषधोपचारासाठी भरती केलं. या शेतकऱ्याच्या पत्नी प्रियंका सचिन वाटाणे यांनी तहसीलदार स्थूल व नायब तहसीलदार देवेंद्र सवई यांच्याविरोधात चांदूर बाजार पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे.

शेतकऱ्याच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, चांदूर बाजार तालुक्यातील मौजे बेलोरा भाग १ शेत सर्वे नंबर १६७ क्षेत्रफळ एक हेक्टर ८९ आर हे शेत वंशपरंपरागत असून सदर शेताला रस्ता रमेश चूडे व सुरेश चूडे यांच्या मालकीच्या शेतात शिवार १६७ / दोन मधून जातो. मात्र त्यांनी तारेचे कुंपण घालून रस्ता बंद केला आहे. आम्ही २५ मे रोजी तहसीलदार यांच्या न्यायालयात अर्ज दाखल करत तात्पुरता रस्ता देण्याची मागणी केली. रस्ता न दिल्यास शेत पडीक राहून नुकसान होईल, असं सांगितलं होतं. मात्र तक्रार दाखल केल्यानंतर आमच्या बाजूने निकाल देण्यासाठी अधिकाऱ्यांनी २० हजार रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्याने त्यांनी हे प्रकरण प्रलंबित ठेवल्याने त्रस्त झालेल्या माझ्या पतीने २८ जून रोजी केला, अशी माहिती सदर शेतकऱ्याच्या पत्नीने दिली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here