मागील आठवड्यात अनिल देशमुख यांच्या नागपुरातील व मुंबईतील घरी ईडीने धाड टाकली होती. एकाच वेळी दहा ठिकाणी ही कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर अनिल देशमुख व त्यांच्या स्वीय सहाय्यकांची चौकशी करण्यात आल्यानंतर देशमुखांच्या दोन स्वीय सचिवांना ताब्यात घेण्यात आलं होतं तर अनिल देशमुखांना चौकशीसाठी ईडीनं समन्स बजावले होते. मात्र देशमुख यांनी वकिलांना पाठवून मुदत मागून घेतली. ईडीने दुसरे समन्स बजावत देशमुख यांना आज चौकशीसाठी बोलावलं आहे. त्यामुळं आज देशमुख चौकशीसाठी हजर राहणार का? याकडे लक्ष लागून राहिले आहे.
वाचाः
राजकीय नेत्यांविरोधात आर्थिक गैरव्यवहारांचे पुरावे असल्याचा दावा करणाऱ्या तरुण परमार या वकिलाची ईडीनं चौकशी केली होती. सोमवारी काही कागदपत्रांसह परमार ईडी कार्यालयात हजर झाले होते. यावेळी त्यांनी काही प्रशासकीय अधिकाऱ्यांबाबतची माहिती ईडी अधिकाऱ्यांना दिली असून व्यवहारांबाबत तपशीलही दिले असल्याचा दावा परमार यांनी केला आहे.
दरम्यान, मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाजवळ गाडीत स्फोटके सापडल्यानंतर, मुंबईचे तत्कालिन पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी पत्र लिहून अनिल देशमुख यांनी गृहमंत्री या नात्याने १०० कोटी रुपयांच्या खंडणी वसुलीचे लक्ष्य दिल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी माजी पोलिस निरीक्षक सचिन वाझेचीदेखील ईडीने चौकशी केली होती. अनिल देशमुखांनी पैशांचा गैरवापर केला, असा ईडीला संशय आहे. त्यातूनच देशमुख यांच्यासह संबंधितांच्या घरावर ‘ईडी’ने शुक्रवारी छापे टाकले होते.
वाचाः
बनावट कंपन्यांमध्ये रक्कम
अनिल देशमुख यांनी मुंबईतील बारमालकांकडून कोट्यवधींची खंडणी घेतल्याची ठोस माहिती ‘ईडी’ला मिळाली आहे. हा पैसा काही बनावट कंपन्यांमध्ये गुंतवला आहे. त्यांच्या खास विश्वासातील एका सनदी लेखापालाच्या माध्यमातून या बनावट कंपन्यांत पैसा गुंतविण्यात आला आहे. ही कंपनी कोलकात्याच्या पत्त्यावर नोंदविण्यात आली आहे. हा व्यवहार सुमारे २० कोटी रुपयांचा असल्याची माहिती ‘ईडी’ला मिळाली आहे. त्यानुसारच हा तपास सुरू आहे.
वाचाः
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times