ठाण्यातील एका २८ वर्षीय महिलेला एकाच वेळी लशीच्या तीन मात्रा दिल्याचा प्रकार समोर आला आहे. ठाणे महापालिकेच्या घोडबंदर रोड परिसरातील आनंदनगर आरोग्य केंद्रामध्ये २५ जून रोजी हा प्रकार घडला आहे. सुदैवाने या महिलेची प्रकृती स्थिर असली, तरी तिला वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखेखाली ठेवण्यात आले आहे. या महिलेचा पती महापालिकेचा कर्मचारी असून, त्यांनी यासंदर्भात कोणत्याही प्रकारची तक्रार नसल्याचे सांगितले आहे. परंतु, या प्रकरणाची दखल घेत महापौर यांनी चौकशी समिती नेमण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. तसेच अशाप्रकारची घटना घडली असल्यास दोषींवर कारवाई करण्यात येईल, असेही महापौरांनी स्पष्ट केले आहे.
ठाण्यातील घोडबंदर रोडवरील आनंदनगर आरोग्य केंद्रामध्ये ब्रह्मांड येथे राहणाऱ्या रूपाली साळी या आनंदनगर लसीकरण केंद्रामध्ये लशीची पहिली मात्रा घेण्यासाठी गेल्या होत्या. पहिली लसमात्रा घेतल्यानंतर त्यांना काही मिनिटांच्या अंतराने आणखी दोन वेळा लस टोचण्यात आली. लसीकरण केंद्रातून बाहेर आल्यानंतर त्यांनी ही बाब त्यांच्या पतीला सांगितली. परंतु, प्रकृती बरी असल्याने त्या दिवशी त्यांनी कोणाला काही सांगितले नाही. मात्र, दुसऱ्या दिवशी त्यांनी ही घटना स्थानिक नगरसेविका कविता पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली. या घटनेची माहिती मिळताच आरोग्य यंत्रणांनी या महिलेची पाहणी करून तिच्या प्रकृतीची तपासणी केली. सोमवारी भाजपचे गटनेते मनोहर डुंबरे यांनी यासंदर्भात सोमवारी आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांची भेट घेऊन त्यांना दोषींवर कारवाई करण्याची विनंती केली. निष्काळजीमुळे हा प्रकार घडला असून, याला प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून तीनदा लसीकरण झाले नसल्याचा दावा करण्यात आला आहे. केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना विचारणा करण्यात आली होती. परंतु, यासंदर्भात आणखी सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times