ईडीकडून या संदर्भात अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. परंतु मुदतवाढ मागून आणि कागदपत्रांची यादी विचारून देशमुख अधिक अडचणीत सापडतील अशी चर्चा आहे. कारण, ईडीने त्यांना पाठविलेल्या कागदपत्रांच्या यादीमध्ये अनेक मागण्या केल्या आहेत. ईडीला अनिल देशमुख यांच्या गेल्या पाच वर्षांच्या उत्पन्नाचा तपशील हवा आहे. संपूर्ण मालमत्तेची माहिती आवश्यक आहे.
साई एज्युकेशनल संस्थेशी त्यांचा काय संबंध आहे, यासंबंधीचे सर्व तपशील त्यांच्या वैयक्तिक सचिव आणि पी.ए. संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे यांच्याकडून मागविण्यात आले आहेत. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल देशमुख यांच्याकडे सहा मुद्द्यांबाबत सविस्तर माहिती मागविण्यात आली आहे. या माहितीशी संबंधित कागदपत्रांसह पुढील चौकशी दरम्यान त्यांना हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे.
‘या’ 6 गोष्टींबद्दल ईडीला अनिल देशमुख यांच्याकडून हवी माहिती
ईडीने अनिल देशमुख यांच्याकडे सहा गोष्टींची माहिती मागितली आहे. त्यांच्या व त्यांच्या कुटुंबाच्या नावे असलेल्या मालमत्तांचा संपूर्ण तपशील अनिल देशमुख यांच्याकडे मागवला गेला आहे. मागील पाच वर्षांच्या प्राप्तिकर विवरणसंदर्भातील माहिती मागितली गेली आहे. नागपूरच्या श्री साई शैक्षणिक संस्थेबद्दल संपूर्ण माहिती मागविण्यात आली आहे. पाच वर्षात जमलेल्या एकूण मालमत्ता आणि उत्पन्नाशी संबंधित तपशील मागवण्यात आला आहे. त्यांचे खाजगी सचिव संजीव पलांडे आणि वैयक्तिक सहाय्यक कुंदन शिंदे यांच्याशी झालेल्या आर्थिक व्यवहारांची माहिती व त्या दरम्यान झालेल्या संभाषणाचा तपशीलही मागवण्यात आला आहे. या माहितीच्या आधारेच त्यांची चौकशी केली जाईल, असे अनिल देशमुख यांचे वकील इंद्रपाल सिंह यांनी सांगितले आहे.
दरम्यान, मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाजवळ गाडीत स्फोटके सापडल्यानंतर, मुंबईचे तत्कालिन पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी पत्र लिहून अनिल देशमुख यांनी गृहमंत्री या नात्याने १०० कोटी रुपयांच्या खंडणी वसुलीचे लक्ष्य दिल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी माजी पोलिस निरीक्षक सचिन वाझेचीदेखील ईडीने चौकशी केली होती. अनिल देशमुखांनी पैशांचा गैरवापर केला, असा ईडीला संशय आहे. त्यातूनच देशमुख यांच्यासह संबंधितांच्या घरावर ‘ईडी’ने शुक्रवारी छापे टाकले होते.
बनावट कंपन्यांमध्ये रक्कम
अनिल देशमुख यांनी मुंबईतील बारमालकांकडून कोट्यवधींची खंडणी घेतल्याची ठोस माहिती ‘ईडी’ला मिळाली आहे. हा पैसा काही बनावट कंपन्यांमध्ये गुंतवला आहे. त्यांच्या खास विश्वासातील एका सनदी लेखापालाच्या माध्यमातून या बनावट कंपन्यांत पैसा गुंतविण्यात आला आहे. ही कंपनी कोलकात्याच्या पत्त्यावर नोंदविण्यात आली आहे. हा व्यवहार सुमारे २० कोटी रुपयांचा असल्याची माहिती ‘ईडी’ला मिळाली आहे. त्यानुसारच हा तपास सुरू आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times