मुंबई : राज्यात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या हालचालींना वेग आला आहे. भाजपही निवडणुकांची जोरदार तयारी करत असल्याचं दिसून आलं. कारण, भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांच्यावर आता आणखी एक नवी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एक मोठी जबाबदारी चित्रा वाघ यांच्यावर सोपवली असून यासंबंधी त्यांनी पत्र लिहून चित्रा वाघ यांना नव्या जबाबदारी विषयी कळवलं आहे.

अधिक माहितीनुसार, महाराष्ट्र भाजपच्या युवती विभागाच्या प्रभारी पदी चित्रा वाघ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. इतकंच नाही तर चित्रा वाघ या उत्तम जबाबदारी सांभाळतील आणि पक्षाला याचा फायदा होईल, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. नव्या जबाबदारीचे पत्र मिळताच चित्रा वाघ यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे शेअर करत पक्षाचे आभार मानले आहे.

चंद्रकांत पाटील यांनी या पत्रामध्ये लिहिलं की, ‘भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष म्हणून आपण ही जबाबदारी मोठ्या जिद्दीनं आणि अत्यंत कुशलतेने पार पाडत आहात. गेले अनेक वर्ष आपण सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्षमपणे कार्यरत आहात. युवती व महिला यांच्या विषयावरील आपला प्रदीर्घ अनुभव लक्षात घेऊन आपल्याकडे भाजप महाराष्ट्र युवती विभागाच्या प्रभारी म्हणून विशेष जबाबदारी सोपविण्यात येत आहे.’

‘आगामी काळात आपण आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन ही जबाबदारी यशस्वीरित्या पार पडाल आणि याचा पक्षाला निश्चित लाभ होईल असा मला विश्वास आहे. आपल्या आगामी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा’ असं चंद्रकांत पाटील यांनी पत्रात लिहिलं आहे. खरंतर, चित्रा वाघ या राजकारणात सक्रिय आहेत. विरोधकांच्या अनेक मुद्द्यांवर त्या चर्चेत असतात. सोशल मीडियावरही त्या नेहमी अॅक्टिव्ह असतात. त्यामुळे याचा आता पक्षाला किती फायदा होतो, हे पाहणं महत्त्वाचं आहे.

दरम्यान, इन्स्टाग्रामवर हे पत्र शेअर करताना चित्रा वाघ यांनीही एक कॅप्शन दिलं आहे. त्यांनी लिहलं की, ‘भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशने आज माझी भाजपा महाराष्ट्र – युवती विभागाच्या प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. पक्षाने दिलेली ही जबाबदारी मी उत्तमरीत्या पार पाडेन हा विश्वास देते.’

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here