० १५ जुलैपासून प्रारंभ

० प्रतिपिंडांची चाचणी

म. टा. विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबई महापालिकेकडून मुलांमधील प्रतिपिंडांची (अँटीबॉडी) चाचणी करण्यासाठी जाहीर झालेल्या सेरो सर्वेक्षणानंतर आता पाचवे सर्वेक्षण केले जाणार आहे. आतापर्यंत चार सेरो सर्वेक्षणांच्या अहवालानंतर १५ जुलैपासून पाचव्या सर्वेक्षणास प्रारंभ केला जाणार आहे. दुसऱ्या लाटेनंतर मुंबईकरांमध्ये किती प्रमाणात प्रतिपिंडे तयार झाली, हे या सेरो सर्वेक्षणातून तपासले जाणार आहे.

करोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून मुंबई पालिकेकडून उच्चभ्रू वस्ती, मध्यमवर्गीय वस्ती, झोपडपट्ट्या परिसरातील रहिवाशांमध्ये किती प्रमाणात अँटीबॉडी तयार झाल्या हे तपासण्यासाठी सेरो सर्वेक्षण केले जाते. गतवर्षी करोनाच्या पहिल्या टप्प्यात पालिकेसोबत अन्य काही संस्थांनी सर्वेक्षण केले होते. तेव्हा त्या सर्वेक्षणात समावेश करण्यात आलेल्या मुंबईकरांच्या रक्तातील नमुन्यांमध्ये झोपडपट्टीमध्ये ५७ आणि बिगर झोपडपट्टी भागात अँटीबॉडीचे प्रमाण १६ टक्के आढळले होते. पहिल्या सर्वेक्षणात ६,९३६ नमुने गोळा करण्यात आले होते.

दुसऱ्या सर्वेक्षणातही पहिल्या प्रमाणेच माटुंगा, चेंबूर, दहिसर विभागांचा समावेश होता. तेव्हा ५,८४० जणांचे नमुने गोळा करण्यात आले होते. त्यावेळेस, झोपडपट्टी भागांमध्ये सरासरी सुमारे ४५ टक्के, बिगर झोपडपट्टी भागांमध्ये सुमारे १८ टक्क्यांप्रमाणे रक्तातील अँटीबॉडी आढळून आल्या. तसेच, तिसऱ्या टप्प्यातील सर्वेक्षणात १०,१९७ व्यक्तींच्या रक्ताचे नमुने तपासले गेले. त्यात ३६.३० टक्के मुंबईकरांमध्ये प्रतिपिंडे आढळली. त्यानंतर १ एप्रिल ते १५ जून २०२१ मध्ये सर्वच विभागात चौथा सेरो सर्वेक्षण केले गेले. त्यात मुलांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक अँटीबॉडी आढळली. आता १५ जुलैपासून पाचवा सर्वेक्षण करणार आहे. त्यासाठी पालिकेच्या सर्व विभागांमध्ये सर्वेक्षण केले जाणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here