कणकवली: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकणला भरभरून दिले असल्यानेच नारायण राणे यांचा जळफळाट होत आहे, असे नमूद करत शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी राणे यांच्यावर धारदार शब्दांत प्रतिहल्ला चढवला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या कोकण दौऱ्यावर राणे यांनी टीकास्त्र सोडले होते. मुख्यमंत्री सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनासाठी आले होते. या जिल्ह्यात केवळ घोषणांपलीकडे मुख्यमंत्र्यांनी कोकणाला काहीही दिले नाही, असा आरोप राणे यांनी काल केला होता. चिपी विमानतळावरूनही राणेंनी मुख्यमंत्र्यांवर उपरोधिक टीका केली होती. या टीकेला आज विनायक राऊत यांनी प्रत्युत्तर दिले.

राऊत यांनी कणकवलीत पत्रकार परिषद घेऊन राणेंचे सर्व आरोप फेटाळून लावलेच शिवाय राणेंमुळेच कोकणचा विकास कसा रखडला हेही सांगितले. मुख्यमंत्र्यांचा कोकण दौऱ्या कमालीचा यशस्वी झाला असून ही बाब न पचल्यानेच राणे कोकणच्या विकासकामांत खोडा घालण्याचे काम करत आहेत. मात्र राणेंनी कितीही आडकाठी आणली तरी कोकणचा विकास आता थांबणार नाही. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार सर्व प्रकल्प वेळेतच मार्गी लागणार आहेत. १ मे रोजी चिपी विमानतळावर विमान उतरणार असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे आणि त्याची पूर्तता निश्चितच मुख्यमंत्री करतील असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.

चिपी विमानतळ आणि सी-वर्ल्ड हे प्रकल्प रखडण्यास नारायण राणेच जबाबदार आहेत, असा थेट आरोप राऊत यांनी केला. सी-वर्ल्ड प्रकल्प तीनशे एकरमध्ये होऊ शकतो पण राणेंना तेराशे एकर जमीन कशासाठी हवी होती?, असा सवालही राऊत यांनी केला. कोकणातील अनेक छोटे-मोठे प्रकल्प राणेंच्या काळात पूर्ण झाले नाहीत. काही प्रकल्पांची तर कामेही सुरू झाली नाहीत. हे प्रकल्प आजच्या मुख्यमंत्र्यांमुळे मार्गी लागत आहेत, असे राऊत म्हणाले. सिंधुरत्न योजना कोकण विकासाला चालना देणारी असून या योजनेसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे राऊत यांनी सांगितले.

Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here