न्यूयॉर्क: सातासमुद्रापार असलेल्या अमेरिकेत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. भारतीय वाणिज्य दूतावासात न्यूयॉर्क, न्यू जर्सी, कनेक्टिकट, पेनसिल्व्हेनिया आणि मॅसॅच्युसेट्स या सभोवतालच्या राज्यातून आलेल्या शिवभक्तांनी हॉल भरगच्च भरला होता.

अमेरिकेतील शिवजयंतीला छत्तीसगड राज्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल व उद्योगपती मनोज शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना भूपेश बघेल यांनी शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव करत आदरांजली वाहिली. छत्तीसगड आणि विदर्भ हे एकाच बेरार प्रांताचे भाग होते आणि आजही मोठ्या प्रमाणात मराठी भाषिक छत्तीसगड मध्ये राहतात असे सांगत महाराष्ट्रासोबत सामाजिक नाळ असल्याचे नमूद केले. सातासमुद्रापार मोठ्या प्रमाणावर साजरी केल्याबद्दल त्यांनी आयोजक छत्रपती फाउंडेशन आणि भारतीय दूतावासाचे कौतुक केले. भारतीय वाणिज्य दूतावासाचे ए.के. विजयकृष्णन यांनी या सोहळ्यास उपस्थित राहून सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त कलाकारांनी शिवजन्म, शिवराज्यभिषेक असे शिवाजी महाराजांशी निगडीत प्रयोग सादर केले.

क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे, खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार विनायक मेटे ह्यांनी विडिओ संदेशाद्वारे कार्यक्रमाला आपल्या शुभेच्छा दिल्या.

मागील सात वर्षांपासून छत्रपती फाउंडेशनच्यावतीने अमेरिकेत शिवजयंती साजरी करण्यात येते. ही छत्रपती फाउंडेशन विद्यार्थी संस्था असून त्यांच्यावतीने विविध उपक्रम राबवले जातात. जिजाऊ जयंती, डॉ. आंबेडकर जयंती, छत्रपती शाहू महाराज जयंती, अहिल्याबाई होळकर जयंती, सावित्रीबाई फुले जयंती आदी उपक्रम वर्षभर राबविले जातात. त्याशिवाय अमेरिकेतील मराठी, भारतीय विद्यार्थ्यांना मदत व मार्गदर्शन केले जाते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here