नवी दिल्ली : भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली भारताला एकाही आयसीसीच्या स्पर्धेत यश मिळवता आलेले नाही. फायनलमध्ये तर भारताला लाजारवाण पराभव पत्करावा लागला. त्यामुळेच रवी शास्त्री यांच्यासाठी आता धोक्याची घंटा वाजलेली आहे. रवी शास्त्री यांची जागा आता कोण घेणार, त्याची चाहुल देखील आता लागलेली आहे.

सध्या भारताचे दोन वेगवेगळे संघ इंग्लंड आणि श्रीलंका दौऱ्यावर गेले आहेत. विशेष गोष्ट म्हणजे, भारताचे माजी कर्णधार ‘द वॉल’ राहुल द्रविड हे मुख्य प्रशिक्षक म्हणून एका संघासह श्रीलंका दौऱ्यावर गेले आहेत. जरी ही तात्पुरती व्यवस्था असली तरी आगामी काळात राहुल द्रविडला भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून आपण पाहू शकतो, असा विश्वास माजी भारतीय खेळाडू रितिंदरसिंग सोधीने व्यक्त केला आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना सोधी म्हणाला की, “राहुल द्रविडला श्रीलंका दौऱ्यासाठी तात्पुरती व्यवस्था म्हणून पाठविण्यात आले आहे, पण आगामी काळात रवी शास्त्रीच्या जागी द्रविडला प्रशिक्षक म्हणून पाहता येईल, हेच याचे संकेत आहेत. शास्त्रींनी चांगली कामगिरी केली आहे, पण त्यांचा कार्यकाळही संपुष्टात येणार असल्याचे सोधी यांनी सांगितले. अशा परिस्थितीत द्रविड त्यांची जागा घेईल. भविष्यात भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड केली जाईल, तेव्हा निवड समितीपुढे राहुल द्रविड हेच एकमेव नाव असेल.”

सोधीने पुढे सांगितले की, जेव्हा द्रविडने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक होण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्याच्याशी भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाविषयीदेखील चर्चा झाली असावी. तो एक कौटुंबिक माणूस आहे आणि घरी वेळही घालवू शकतो, पण त्याने मोठी जबाबदारी स्वीकारण्याचे ठरविले आहे.

विशेष गोष्ट म्हणजे, राहुल द्रविडच्या प्रशिक्षणाखाली भारतीय युवा खेळाडूंचे उत्तम मार्गदर्शन झाले आहे. 19 वर्षांखालील आणि भारत अ संघांच्या प्रशिक्षकपदाची भूमिका निभावल्यानंतर आता तो राष्ट्रीय कर्तव्यावर म्हणजे नॅशनल ड्युटीवर आहे. पृथ्वी शॉ, शुभमन गिल असे खेळाडू द्रविडच्या मार्गदर्शनाखाली खेळून पुढे आले आणि त्यांनी टीम इंडियामध्ये स्थान मिळविले. द्रविडचे मार्गदर्शन आणि शिखर धवनच्या नेतृत्वात श्रीलंका दौर्‍यावर भारतीय संघ कशी कामगिरी करतो, याकडे भारतीय क्रिकेट प्रेमींचं लक्ष लागलं आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here