अहमदनगरः राज्यातील प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांच्या वतीने आज महाराजांच्या वकिलांनी व सेवकांनी नगर येथे जिल्हा रुग्णालयात येऊन त्यांना दिलेल्या नोटिशीबाबत खुलासा सादर केला आहे. दरम्यान या संदर्भामध्ये जिल्हा रुग्णालयाच्या वतीनं माहिती देण्यास नकार देण्यात आला आहे. तर, संबंधित वकिलांनी दोन दिवसानंतर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे यांनी नेमका काय खुलासा दिला आहे, हे अद्याप समोर आले नाही.

कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या वक्तव्यावरून मोठा गदारोळ झाला आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्यावर अनेक सामाजिक संघटनांनी आक्षेप घेतलेला आहे. दुसरीकडे नगरचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रवीण मुरंबीकर यांनी महाराजांना नोटीस बजावून खुलासा सादर करण्यास सांगितले होते. या नोटिशीचा खुलासा करण्याचा आज शेवटचा दिवस होता. आज सुट्टी असल्यामुळे खुलासा येतो की नाही, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. अखेर इंदोरीकर महाराजांचे वकील अॅड. शिवलीकर हे एका सेवकासमवेत आज दुपारच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात पोहोचले. त्यांनी तेथील अधिकाऱ्यांशी फोनवरून संपर्क केला, त्यावेळी त्यांना रुग्णालयात उपस्थित असलेल्या डॉक्टरांकडे तुम्ही खुलासा सादर करा, असे सांगितले. त्यानंतर अपघात कक्ष विभागामध्ये कार्यरत असलेल्या डॉक्टरांकडे खुलासा सादर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे महाराजांच्या वकिलांनी हा खुलासा दिल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याची सही व शिक्का घेऊन दुसऱ्या दाराने निघून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचवेळी माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना खुलाशाबाबत विचारणा केली. त्यावर त्यांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला. दोन दिवसांमध्ये महाराज स्वतः भूमिका स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here